मुंबई | प्रतिनिधी | Mumbai
उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना (Shivsena UBT and MNS) मुंबईसह सात महापालिकांची निवडणूक एकत्र लढणार असून बुधवारी (दि. २४) या बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित युतीवर शिक्कामोर्तब होईल. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मंगळवारी एक्स या समाज माध्यमातून ठाकरे बंधूंच्या राजकीय मनोमिलनाचे सूतोवाच केले. कोण किती जागा लढणार हे आज जाहीर होण्याची शक्यता नसली तरी मुंबईत शिवसेना ठाकरे गट १३५, मनसे ७२ आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष २० जागा हे सूत्र निश्चित झाल्याचे समजते.
शालेय अभ्यासक्रमात इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीच्या करण्याच्या निर्णयाच्या विरोधात एकत्र आल्यापासून महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याची चर्चा सुरु होती. त्यानुसार जवळपास दोन दशकांचे राजकीय वैर संपवून राजकारणात एकत्र येण्याचा निर्णय ठाकरे बंधूंनी घेतला होता. त्यानुसार मुंबईबरोबरच ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, मिरा-भाईंदर, नाशिक आणि पुणे या प्रमुख महानगरपालिकांमध्ये एकत्र लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर गेल्या दोन आठवड्यापासून दोन्ही पक्षात जागावाटपाची बोलणी सुरू होती. मुंबईतील (Mumbai) काही जागांचा अपवाद वगळता जागावाटपाची बोलणी पूर्ण झाली असून आज दुपारी १२ वाजता उद्धव आणि राज ठाकरे (Raj Thackeray) संयुक्त पत्रकार परिषदेत युतीची घोषणा करणार आहेत. यानिमित्ताने राज ठाकरे प्रथमच अधिकृत युतीच्या माध्यमातून निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत.
नाशिकची चर्चा पूर्ण
नाशिकची (Nashik) चर्चा पूर्ण झाली असून पुणे, कल्याण-डोंबिवलीचा विषय संपलेला आहे. ठाणे आणि मीरा-भाईंदरमध्येही जागावाटपाचा प्रश्न आम्ही संपवलेला आहे. सात-आठ महानगरपालिकांचा विषय एकत्र हाताळताना थोडा वेळ लागतो. मुंबई महापालिकेबाबत दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांच्या भावना समजून घ्याव्या लागतात. काही ठिकाणी विद्यमान नगरसेवकांच्या जागांची अदलाबदल करावी लागते, त्यासाठी लोकांना एकत्र बसवून मार्ग काढावा लागतो. या सगळ्या प्रक्रिया जवळजवळ पूर्ण झालेल्या आहेत, असे राऊत यांनी सांगितले.
पवार कुटुंबही एकत्र येणार?
ठाकरेंनंतर पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असून २६ डिसेंबर रोजी याची घोषणा होणार असल्याची माहिती स्वतः अजित पवार यांनी दिली.कार्यकर्त्यांशी बोलताना अजित पवारांनी २६ तारखेला अधिकृत घोषणा करू, असे सांगितले. तसेच कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, २६ तारखेला सगळ्या गोष्टी समोर येतील. कोण काय बोलते यावर विश्वास ठेवू नका, असेही अजित पवारांनी कार्यकर्त्यांना उद्देशून म्हटले. यासंदर्भात उद्या अजित पवार मुंबईत आढावा घेणार आहेत. दरम्यान, दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चेनंतर शरद पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्या तर मी पक्षातून राजीनामा देईन, असा इशारा दिला होता. मात्र, प्रशांत जगताप यांच्या या इशाऱ्याने दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसला फारसा फरक पडलेला दिसत नाही.पुण्यात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सर्व पक्षांच्या आघाडीचा प्रस्ताव तयार केला जाणार आहे. त्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी हातमिळवणी करून ठाकरेंच्या शिवसेनेलाही सोबत घेणार असल्याची चर्चा सुरू आहे. अजित पवारांना याबाबत प्रस्ताव दिला जाणार असल्याची माहिती शशिकांत शिंदे यांनी दिली. त्यामुळे शशिकांत शिंदेंचा प्रस्ताव अजित पवार स्वीकारणार की नाही? याकडे आता महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. तसेच या प्रस्तावामुळे पुण्यात अजित पवार महाविकास आघाडीसोबत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.




