मुंबई | Mumbai
राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात आज (२३ फेब्रुवारी)दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहून झाली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत अजितदादांच्या शोकप्रस्तावावर बोलतांना आपल्या भावना व्यक्त केल्या. यानंतर माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीही भावना व्यक्त केल्या. यावेळी अजितदादांच्या आत्म्यास शांति लाभो असे म्हणताना ते भावूक झाल्याचे दिसून आले.
यावेळी ते म्हणाले की, अजितदादा कधीही खचले नाहीत. एखादा माणूस खचलेल्या मनाचा असता तर कदाचित वेगळा मार्ग निवडला असता, पण हे राजकारण किंवा ही संस्कृती महाराष्ट्राची नाही. महाराष्ट्राने एक उमदे नेतृत्व गमावलं आहे. महाराष्ट्र ज्यांच्याकडून अपेक्षा करतो ती माणसं अचानक निघून जातात, हे राज्याचं दुर्दैव आहे. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, आर. आर. पाटील आणि आता अजितदादा यांच्यासारखी माणसं आता पुन्हा होणार नाहीत. असे मित्र पुन्हा मिळणार नाहीत, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले.
हे देखील वाचा : Devendra Fadnavis : “अजितदादा आपल्यात नसल्याची खंत, ते खऱ्या अर्थाने माझे…”; शोक प्रस्तावावर बोलतांना CM फडणवीसांनी जागवल्या आठवणी
पुढे ते म्हणाले, “आजपर्यंत नेहमी सभागृहात दिसणारे अजितदादा (Ajit Dada) आज दिसत नाही ही खंत आपल्या सगळ्यांच्या मनात आहे. माझ्या कारकिर्दीची सुरुवात ही अजितदादांच्या पक्षाच्या आणि त्यांच्या विचार धारणेच्या विरोधातील होती. आम्ही कधी एकत्र येऊ असं ध्यानीमनी सुद्धा वाटलं नव्हतं. दोन सकाळ अशा होत्या त्यातली एक सकाळ ही महाराष्ट्राला त्यांच्या कृतीने धक्का देणारी होती आणि दुसरी सकाळ ही महाराष्ट्राच्या अंतकरणाला चटका देणारी होती. प्रशासकीय कामकाजात त्यांचा खंबीर पाठिंबा होता. विषयाचा सखोल अभ्यास करणारा सहकारी अभावानेच आढळतो. एका मोठ्या वृक्षाच्या सावलीतून बाहेर पडून स्वत:ची ओळख निर्माण करणं अवघड असतं, आणि ते दादांनी करून दाखवलं”, असेही उद्धव ठाकरेंनी सांगितले.
अजितदादांनी आपल्या कर्तृत्वाने सर्वांना उत्तरे दिली
उद्धव ठाकरे म्हणाले की, अजितदादा कधीही स्वतःबद्दल हताशपणे बोलले नाही. माझ्यावर एवढे आरोप होत आहेत, आता काय करायचं? असं त्यांनी कधीही म्हटलं नाही. त्यांनी प्रत्येक आरोपाला आपल्या कामातून उत्तर दिलं. इतकंच नव्हे तर ज्यांनी आरोप केले, त्यांनीही पुढे त्यांना सहकारी म्हणून स्वीकारलं. अनेकदा आरोपांमुळे व्यक्ती बदनाम होते; पण दादांनी डगमगून न जाता आपल्या कर्तृत्वाने सर्वांना उत्तरे दिली, असे त्यांनी म्हटले.
हे देखील वाचा : Eknath Shinde : शब्द आणि वेळेला महत्व देणारा नेता अन् ११ वेळा अर्थसंकल्प मांडणारा विक्रमवीर गमावला – DCM शिंदे
बारामतीच्या सांगितल्या आठवणी
मी मुख्यमंत्री असताना आम्ही बारामतीला गेलो तेव्हा ते उत्साहात तिथला कायापालट दाखवत होते. पण दुर्घटनेनंतर मध्यरात्री मी जेव्हा तिकडे गेलो, तेव्हा ती बारामती पोरकी झालेली मला वाटली. त्यांची ११ वाजताची वेळ असेल तर गाडी दारात उभी असायची. टेबल, पेन, कागद काटकोनात ठेवलेले असायचे. हीच सवय बाळासाहेबांना देखील होती, असे सांगत त्यांनी अजितदादांच्या कामाच्या शिस्तीचाही विशेष उल्लेख केला.
करोनात समतोल राखत राज्यकारभार सुरळीत ठेवला
करोना कालावधीतील लॉकडाऊनच्या काळात मंत्रालय बंद असले तरी महाराष्ट्र बंद नव्हता. अर्थचक्र थांबण्याची भीती निर्माण झाली होती. मात्र, त्या कठीण काळातही अजितदादांनी समतोल राखत राज्यकारभार सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न केला. अजितदादांसारखा एक भरोसेमंद उत्तम दिलदार केवळ सहकारीच नव्हे तर मित्र मी गमावला आहे. अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी अजित पवारांच्या कार्यशैलीची आणि व्यक्तिमत्त्वाची आठवण काढत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.





