नवी दिल्ली | New Delhi
शिवसेना (उबाठा) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे सहकुटुंब काल (बुधवारी) दिल्लीत दाखल झाले. आज (गुरुवारी) त्यांच्या दिल्ली दौऱ्याचा (Delhi Tour) दुसरा दिवस असून, ते आज इंडिया आघाडीच्या बैठकीत सहभागी होणार आहेत. तसेच रात्री राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) घरी स्नेह भोजनाला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. त्याआधी उद्धव ठाकरे यांनी खासदार संजय राऊत यांच्या दिल्लीतील निवासस्थानी पक्षाच्या खासदारांची बैठक घेतली. यामध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधतांना वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करत पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला.
यावेळी बोलतांना उद्धव ठाकरे म्हणाले की, “सरकारला (Government) नीतिमत्ता राहिली नाही. आताचे सत्ताधारी फक्त मतलबी आहेत. देशाचे सरकार चालवतंय कोण? देशाला पंतप्रधानांची गरज आहे. मोदी, शहा हे देशाचे नाहीत तर भाजपचे (BJP) प्रचारमंत्री आहेत. देशाला मजबूत पंतप्रधान, गृहमंत्र्यांची गरज आहे. जेव्हा देशावर संकट येते तेव्हा ते गायब होतात.’, अशा शब्दात त्यांनी सरकारवर टीका केली.
पुढे मनसेच्या (MNS) युतीवर बोलतांना उद्धव ठाकरे म्हणाले की, “आम्हा दोघांचा निर्णय घेण्यास आम्ही दोन्ही बंधू खंबीर आहोत. आम्हाला जे करायचं आहे ते आम्ही करू, यात आम्हाला तिसऱ्याची आवश्यकता नाही”, असे त्यांनी सांगितले. तसेच इंडिया आघाडीबाबत कोणत्याही अटी-शर्ती नाहीत”, असेही त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय उपराष्ट्रपतींना तडकाफडकी काढलं का? आणि सध्या उपराष्ट्रपती कुठे आहेत. याची पहिल्यांदा चर्चा झाली पाहिजे, असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले.
तसेच बिहारमध्ये (Bihar) सुरु असलेल्या मतदार याद्यांच्या सुधारणावरूनही उद्धव ठाकरे यांनी हल्लाबोल केला. ते म्हणाले की, “देशात अघोषित सीएए-एनआरसी लागू झालं आहे का? तुम्ही तुमची ओळख पटवून द्या, असे आयोगाकडून सांगितले जात आहे. सीएए-एनआरसी अशाच पद्धतीने लागू करण्यात येणार होते, असेही त्यांनी म्हटले. तर व्हीव्हीपॅटसंदर्भात प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “ईव्हीएमबाबत (EVM) संभ्रम असताना व्हीव्हीपॅट कशाला पाहिजे. व्हीव्हीपॅट बंद करता मग निवडणुका घेता कशाला? व्हीव्हीपॅट काढण्यापेक्षा निवडणुकाच घेऊ नका”, असे म्हटले.
तर ट्रम्प यांनी मोदींना (Modi) धमकी दिली यावर प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “ट्रम्पच्या धमकीनंतर मोदींना शेतकरी आठवतात का? ट्रम्प आपल्या देशाची आणि पंतप्रधानांची खिल्ली उडवत आहेत. आपण त्यांना काही उत्तरसुद्धा देऊ शकत नाहीत. त्यांना जाब विचारायचे सोडाच पण आपण त्यांना उत्तर देखील देऊ शकत नाही. कारण या देशाचं सरकार कोण चालवतं? ” असेही त्यांनी म्हटले.




