मुंबई | Mumbai
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) फूट पडल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार (Ajit Pawar) एकत्रित दिसल्याचे प्रसंग फार कमी घडले आहे. मात्र, पुन्हा एकदा शरद पवार आणि अजित पवार पुण्यातील मांजरी येथील वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीसाठी दोन्ही एकत्र येणार आहेत. आज सकाळी ही बैठक होणार असून त्या ठिकाणी शरद पवार आणि अजित पवार एकत्र भेटणार आहेत. परंतु, या भेटीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात भेट होऊन ३० मिनिटांपेक्षा जास्त वेळ चर्चा झाली.
गेल्या काही दिवसांपासून शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. पाटील शरद पवार यांची साथ सोडणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. मात्र, जयंत पाटील यांनी स्पष्ट शब्दांत अशा चर्चा फेटाळून लावल्या आहेत. परंतु, तरीदेखील या चर्चा काही थांबताना दिसत नाहीत.त्यातच आज जयंत पाटील आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा झाल्याने राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेण्यासाठी आणि त्यांना निवेदने देण्यासाठी एकच गर्दी झाली होती. यावेळी जयंत पाटील तेथे दाखल झाले. त्यानंतर जयंत पाटील यांना पाहताच अजित पवारांच्या कक्षातील बाकीच्या सर्व लोकांना बाहेर काढण्यात आले.तसेच सुरक्षा रक्षकांनाही (Security Guards) बाहेर जाण्यास सांगण्यात आले. याशिवाय अजित पवारांच्या स्वीय सहाय्यकांनाही बाहेर थांबण्याच्या सूचना देण्यात आल्या. सगळे बाहेर गेल्यानंतर दोन्ही नेत्यांत जवळपास अर्धा तास चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.