सांगली | Sangali
जिल्ह्यातील इस्लामपूरमध्ये (Islampur) महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या प्रा.डॉ. एन.डी.पाटील विधी महाविद्यालय, सरोज नारायण पाटील मानसशास्त्र संशोधन केंद्र आणि प्रा. डॉ. एन. डी. पाटील बहुउद्देशीय सभागृहाचा उद्धघाटन सोहळा दिग्गजांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या भगिंनी आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या आत्या सरोज पाटील (Saroj Patil) यांनी आपल्या भाषणात अजित पवार आणि रोहित पवार यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.
त्यानंतर भाषणादरम्यान अजितदादा आणि रोहित पवार यांच्यात चांगलीच राजकीय जुगलबंदी रंगल्याचे बघायला मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आपल्या भाषणात अजितदादांना उद्देशून ‘दादा गावकीचा विचार करतात. मात्र, भावकीला विसरले’ असे म्हणत टोला लगावला होता. त्यानंतर अजित पवारांनी (Ajit Pawar) आपल्या भाषणामध्ये रोहित पवार यांच्या या भावकीचा संदर्भ घेत ‘भावकीने लक्ष दिले म्हणून निवडून आलास’ असे म्हणत पलटवार केला.
हे देखील वाचा : Ajit Pawar : “दुसऱ्यांच्या पक्षात नाक खुपसण्याचे काम करू नये”; अजितदादांचा ‘त्या’ टीकेवरून रोहित पवारांना सणसणीत टोला
यावेळी बोलतांना अजित पवार म्हणाले की, “रोहित आपल्या भाषणात बोलताना मगाशी म्हणाला की ‘दादांचे गावकीकडे लक्ष आहे, भावकीकडे लक्ष नाही. त्यावर अजितदादा म्हणाले ‘भावकीकडे लक्ष दिलं म्हणून तू आमदार झालास. आपण बॅलेट पेपरवर निवडून आला आहात. जयंत पाटील जरा त्यांना सांगा असे म्हणत अजित पवार यांनी रोहित पवारांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. तसेच मी महायुतीमध्ये (Mahayuti) गेल्यापासून तुमच्या कुणावर टीका केली आहे का? तुम्ही तुमच्या विचाराने चालत आहात. मी माझ्या विचाराने चाललो आहे, असे म्हणत अजित पवारांनी माझ्या नादाला लागू नका, असा इशारा यावेळी दिला.
पुढे ते म्हणाले की, “आम्ही शाहू,फुले आंबेडकरांच्या विचारधारेमध्ये कुठेही तडजोड केलेली नाही. मला रोहितने सांगितले की, जयंत पाटील (Jayant Patil) आणि मी हेलिकॉप्टरने जाईल. त्यावेळी मला असं वाटलं माझं भाषण ऐकायला दोघेही नाहीत. मात्र, माझे नशीब बघा की दोघे सुद्धा भाषण (Speech) ऐकायला आहेत”, असेही अजित पवार यांनी म्हटले.




