मुंबई | Mumbai
छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे (Vijay Ghadge) यांना राष्ट्रवादीचे तत्कालीन युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण (Suraj Chavan) यांनी मारहाण केली होती. या प्रकरणानंतर चव्हाण यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या (NCP) प्रदेशाध्यक्षपदावरून हटवण्यात आले होते. मात्र, अवघ्या एका महिन्याच्या आतच त्यांचे राजकीय पुनर्वसन करण्यात आले असून, त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांवर टीका केली होती. त्यानंतर आता अजितदादांनी रोहित पवारांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. ते कोल्हापूरात माध्यमांशी बोलत होते.
यावेळी अजित पवार म्हणाले की, “आम्ही आमच्या पक्षात काय करावं हे बाकीच्यांनी आम्हाला फुकटचा सल्ला देण्याची गरज नाही. त्यांनी त्यांच्या पक्षाचं बघावं. राज्यात काहींना असं वाटायला लागलं आहे की, आपण फारच मोठे नेते झालो आहोत. आणि महाराष्ट्राचा सगळा मक्ता त्यांनाच (रोहित पवार) दिला असे ते वागायला लागले आहेत. ठीक आहे बोलण्याचा ज्याचा त्याचा तो अधिकार आहे. पण त्यांनी अगोदर त्यांचा पक्ष सांभाळावा, इतर पक्षात नाक खुपसण्याचे काम करू नये,” असा सणसणीत टोला अजित पवारांनी आमदार रोहित पवार यांना लगावला आहे.
रोहित पवार काय म्हणाले होते?
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत अजित पवारांवर टीका केली होती. ते म्हणाले होते की, “लातूरमध्ये केलेल्या गुंडगिरीप्रकरणी पदाधिकाऱ्याचा राजीनामा घेण्याचा अजितदादांचा निर्णय योग्यच होता. परंतु महिनाभराच्या आतच त्या वादग्रस्त पदाधिकाऱ्याचे प्रमोशन केले जात असेल तर याला काय म्हणायचं? अजितदादांच्या पक्षात दोन गट असून, दुसरा भाजपप्रेमी गट जाणूनबुजून अजितदादांची प्रतिमा खराब करण्यासाठी कार्यरत असतो. ‘शब्दाला पक्का’ या अजितदादांच्या प्रतिमेला धक्का देण्यासाठी कालची वादग्रस्त नियुक्ती केली गेली अशी चर्चा आहे. मारहाण (Beating) करताना फ्रॅक्चर झालेल्या हातावरील प्लास्टरचा पट्टा निघण्याच्या आतच प्रमोशन केलं. नियुक्ती करणाऱ्याच्या हिमतीला दाद द्यावी लागेल. शेवटी विनाशकाले विपरीत बुद्धी”, असा टोला रोहित पवार यांनी लगावला होता.
राष्ट्रवादीत सुप्त संघर्ष उफाळण्याची शक्यता
सूरज चव्हाण यांना सरचिटणीस केल्यानंतर दुसऱ्या फळीतील नेत्यांसह पक्षाच्या काही फ्रंटल सेलच्या अध्यक्ष नाराज असल्याचे बोलले जात आहे. या नेत्यांनी अनेक मुद्द्यांवर या आधीही अजित पवारांकडे तटकरे यांच्या कार्यशैलीवरून तक्रार करण्यात आली होती. तसेच या नेत्यांनी पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष आणि महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्या कार्यपद्धतीवरून देखील पक्षाध्यक्ष अजित पवारांकडे तक्रार केली होती. त्यामुळे सुनील तटकरे समर्थक आणि अजित पवार समर्थक यांच्यातील सुप्त संघर्ष पुढच्या काळात अधिक उफाळून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.




