मुंबई | Mumbai
महाराष्ट्र विधान सभेचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. महाराष्ट्रात निवडणुका कधी जाहीर होतात याकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहिले होते. पुढील महिन्यात महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार आहे. त्याआधी, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या आहे. गेल्या ५ वर्षात महाराष्ट्राच्या सत्ताकारणात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या आहे. त्यामुळे यंदाची विधानसभा निवडणुक अत्यंत चुरशीची होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्राचे राजकारण कसे बदलले, याचा एक धावता आढावा घेऊयात.
२०१९ ते २०२४ या पाच वर्षांच्या कालावधीत महाराष्ट्रातील जनतेने राजकारणातील अनेक नाट्यमय घडामोडी अनुभवल्या आहे. महाविकास आघाडीचा उदय, एकनाथ शिंदेंची बंडखोरी, देवेंद्र फडणवीसांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी, अजित पवार यांची बंडखोरी, पुन्हा उपमुख्यमंत्री पदी शपथ अशा अनेक घडामोडी या पाच वर्षात घडल्या. या घडामोडींवर एक नजर टाकूयात.
सन २०१९ साली भाजप आणि शिवसेना युतीने विधानसभेची निवडणुक लढवली होती. त्यात भाजपला १०५ जागांवर यश मिळाले होते तर शिवसेनेला ५८ जागांवर विजयी प्राप्त झाला होता. मात्र, निकाल लागल्यानंतर मुख्यमंत्रीपदावरुन युतीमध्ये फुट पडल्याने शिवसेना युतीतून बाहेर पडली.
भाजप-शिवसेनेची महायुती तुटल्यानंतर नवी समीकरणे निर्माण झाली. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस असे तीन पक्ष एकत्र आले आणि महाविकास आघाडीचा जन्म झाला. शरद पवार यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी निर्माण झाली. २०१९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला ५४ तर काँग्रेसला ४४ जागा मिळाल्या होत्या.
एकीकडे राज्यात महाविकास आघाडीच्या सत्तास्थापनेच्या चर्चा सुरू असतानात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी काही आमदारांना सोबत घेऊन देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सत्ता स्थापनेचा दावा केला. राजभवनात देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तर अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. २३ नोव्हेंबर २०१९ चा हा पहाटेचा शपथविधी तेव्हा राज्यात खळबळ उडवून देणारा ठरला होता.
देवेंद्र फडणवीसांसोबत केलेला सत्तेचा प्रयोग हा ८० तासांतच फसला होता. कारण अजित पवार स्वगृही परतले होते. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी काही तासांमध्ये राजीनामा दिल्याने सर्वात कमी कालावधीसाठी राज्याचा मुख्यमंत्री होण्याचा विक्रम त्यांच्या नावावर नोंदवला गेला होता.
अजित पवारांनी राजीनामा देऊन ते पुन्हा स्वगृही परतले. यानंतर महाविकास आघाडीने सत्तास्थापनेचा दावा केला. महाविकास आघाडीच्या बैठकीत सर्वानुमते मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे यांच्या नाववर शिक्कामोर्तब करण्यात आले. २८ नोव्हेंबर २०१९ रोजी महाराष्ट्र राज्याचे १९वे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली.
मात्र, एकनाथ शिंदे यांनी २०२२ साली जूनमध्ये शिवसेनेत बंड केले, ज्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. २०२२ साली जून महिन्यात महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या निवडणुका पार पडताच एकनाथ शिंदे हे शिवसेनेतील ४० आमदारांना घेऊन सुरतला पोहोचले. त्यानंतर सूरतमार्गे ते गुवाहाटीला पोहोचले. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाविकास आघाडी सरकार अस्थिर झाले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला आणि महाविकास आघाडी सरकार पडले.
शिंदे आमदारांसह मुंबईत परतल्यानंतर भाजपने मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंच्या नावाची घोषणा केली. एकनाथ शिंदे यांनी दिनांक ३० जून २०२२ रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यात शिवसेना-भाजपचे सरकार आले. मात्र, त्यानंतर शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह कोणाला मिळणार यावरुन ठाकरे गट व शिंदे गट यांच्यात संघर्ष पेटला होता. निवडणूक आयोगासमोरील याचिकेमध्ये आयोगाने शिंदे गटालाच खरी शिवसेना म्हणून मान्यता दिली. पक्षाचे नाव आणि पक्षचिन्ह शिंदे गटाला मिळाले. तर, ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह मिळाले.
अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेससोबत बंड पुकारत काही आमदारांना घेत बाहेर पडले. त्यानंतर २ जुलै २०२३ रोजी अजित पवारांनी शिवसेना भाजप सरकारमध्ये सामील होत पुन्हा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्यासोबत छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, अनिल पाटील, आदिती तटकरे, धर्मरावबाबा अत्राम आणि संजय बनसोडे यांनीही कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर राज्यात महायुती जन्माला आली. अजित पवारांच्या या भूमिकेला शरद पवारांचा पाठिंबा नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.
महाराष्ट्रातील राजकीय पक्षांची सध्याची स्थिती पाहता महायुतीच्या एकूण तीन घटक पक्षांकडे १७८ पेक्षा अधिक आमदार आहेत. तर, महाविकास आघाडीतील पक्षांकडे सध्या ७५ आमदार आहेत. त्यामुळे २०२४ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये हे चित्र बदलणार का? हे आता नोव्हेंबर अखेपर्यंत स्पष्ट होईल.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा