मुंबई | Mumbai
प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक आणि अभिनेते महेश मांजरेकर यांच्या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ‘मराठी माणसांसाठी आमच्यातील वाद किरकोळ असून, मी महाराष्ट्राच्या हितासाठी माझा इगो बाजूला ठेवून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत युती करण्यास तयार आहे, असे म्हटले होते. त्यानंतर राज ठाकरेंच्या या आवाहनाला प्रतिसाद देतांना उद्धव ठाकरेंनी ‘मी देखील किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला तयार आहे. पण माझी अट एक आहे की, महाराष्ट्राच्या हिताच्या जो आड येईल त्याचं स्वागत मी करणार नाही, त्याला घरी बोलवणार नाही, त्याच्या घरी मी जाणार नाही, त्याच्या पंगतील बसणार हे आधी ठरवा’, असे म्हटले होते.
यानंतर आता राजकीय वर्तुळात यावर प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली असून,राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी माध्यमांशी बोलतांना प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “दोघांची काय मतं आहेत? याची मला कल्पना नाही. अनेकांची मात्र इच्छा आहे की, दोघांनी एकत्र यावे. २०१४ मध्ये एकत्र येण्याची संधी त्यांना होती. संधी चालून आली होती. राजकारणामध्ये (Political) कधी काय होईल हे सांगता येत नाही. मागील काही दिवसांत तुम्ही आम्ही कल्पना केली नाही, असे घडले आहे. मात्र, लगेच असे काही होईल असे वाटत नाही, पण माझ्या शुभेच्छा आहेत”, असे त्यांनी म्हटले.
पुढे बोलतांना भुजबळ म्हणाले की,”दोघे एकत्र आले तर ठाकरेंची मोठी ताकद निर्माण होईल. मुंबई महापालिकेची निवडणूक जवळ येत आहे. राज ठाकरे यांची उपयुक्तता सर्वांना वाटत आहे. प्रादेशिक पक्षाचे प्राबल्य आहे. पश्चिम बंगाल, बिहार, दक्षिणेकडे सगळीकडे प्रादेशिक पक्ष हवेत. राज ठाकरे यांच्याकडे एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, उदय सामंत जातात. जेवण करतात आणि नंतर सांगतात भोजनावर चर्चा झाली. माझा त्यावर विश्वास नाही, राजकीय चर्चा होतच असते. प्रादेशिक पक्षाचे सरकार बनवितात. दोन्ही ठाकरे एकत्र येणे ही त्यांची हतबलता नाही, त्यांना बाळकडू घरातूनच मिळाले आहे”,असेही त्यांनी म्हटले.