नागपूर | प्रतिनिधी | Nagpur
राज्य मंत्रिमंडळाचे (State Cabinet) खातेवाटप लवकरात लवकर म्हणजे आज रात्री उशिरा किंवा उद्या सकाळी होऊ शकते, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी शनिवारी येथे दिली. महायुती सरकारचे (Mahayuti Government) खातेवाटप अंतिम झाल्याचे संकेत फडणवीस यांनी यावेळी दिले. राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजल्यानंतर देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानभवन परिसरात पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना त्यांनी मंत्रिमंडळाच्या खातेवाटपाविषयी माहिती दिली.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, बेस्ट बस ही मुंबईची लाईफ लाईन आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना बेस्टच्या सेवेत जादा नवीन बसेस घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे बेस्टला राज्य सरकार मदत करेल. तसेच बेस्टला मदत करण्याबाबत मुंबई महापालिकेला सूचना देण्यात येतील, असे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) तोंडावर काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी भारत जोडो यात्रा काढली. या यात्रेत १८० संघटना काम करत होत्या. त्यात काही संघटना या शहरी नक्षली संघटना म्हणून कार्यरत होत्या. तत्कालीन यूपीए सरकार आणि माजी गृहमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांनी शहरी नक्षली संघटनांबाबत जी माहिती दिली, त्याच माहितीच्या आधारे मी विधानसभेत या संघटना काम करत असल्याचे सांगितल्याचे फडणवीस म्हणाले. बीडच्या प्रकरणात सरकार कुणालाही सोडणार नाही. तसेच परभणीच्या घटनेत सत्य बाहेर यावे म्हणून न्यायालयीन चौकशी जाहीर केल्याचे मुख्यमंत्र्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
शिंदे नगरविकास, अजित पवार वित्त आणि नियोजन
दरम्यान, मंत्रिमंडळाच्या खातेवाटपात देवेंद्र फडणवीस हे स्वतःकडे सामान्य प्रशासन, गृह ही महत्वाची खाती स्वतःकडे ठेवणार असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाला नगरविकास, गृहनिर्माण, उद्योग ही खाती दिली जाणार आहेत. स्वतः शिंदे स्वतःकडे नगरविकास विभाग ठेवणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना वित्त आणि नियोजन खाते दिले जाणार असल्याचे समजते . मात्र, त्याचवेळी भाजप वित्त आणि नियोजन खाते स्वतःकडे ठेवून अजितदादांना महसूल खाते देणार असल्याची चर्चा आहे. तर शिंदे गटातील मंत्री उदय सामंत यांना उद्योग किंवा गृहनिर्माण, प्रताप सरनाईक यांना परिवहन, भरत गोगावले यांना रोजगार हमी आणि फलोत्पादन, प्रकाश आबिटकर यांना शालेय शिक्षण किंवा सार्वजनिक आरोग्य, संजय शिरसाट यांना पाणी पुरवठा आणि स्वच्छता, गुलाबराव पाटील यांना सामाजिक न्याय ही खाती मिळणार असल्याची चर्चा आहे.