मुंबई | Mumbai
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज (सोमवारी) सकाळी माध्यमांशी बोलतांना ‘संघाची चर्चा बंद दाराआड असते, ती बाहेर येत नसते. तरीही काही संकेत असतात ते स्पष्ट आहेत. संघ ठरवेल तो महाराष्ट्रातील (Maharashtra) नेता बहुतेक नरेंद्र मोदींचा पुढचा वारसदार असेल, असे विधान केले होते. त्यावर आता खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रत्युत्तर देत राऊत यांच्यावर पलटवार केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की,”सर्वांना विश्वासात घेऊन राज्याच्या कारभार सुरू आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी जे लोक आम्हाला मदत करतील त्या सर्वांना सोबत घेऊनच आम्ही काम करणार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे स्वतः सक्षम आहेत. त्यांना कुठल्याही पद्धतीची अडचण नाही. त्यामुळे मोदींचा उत्तराधिकारी शोधण्याची कुठलीही गरज नाही. ते अजून बरेच वर्ष काम करू शकतात. २०२९ मध्ये पंतप्रधान म्हणून देश मोदींकडे पाहत आहे. वडील जिवंत असताना त्यांचा वारसदार शोधणे ही आमच्या देशाची परंपरा नाही. ही मुघली संस्कृती आहे आणि तसाही उत्तराधिकारी (Successor) याच्याशी माझा कुठलाही संबंध नाही”, असे त्यांनी सांगितले.
राऊत काय म्हणाले होते?
भाजपच्या (BJP) राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी संघाची एक भूमिका आहे. त्यानुसार संघाला हवी असलेली व्यक्ती भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी यावी ही संघाची भूमिका मला स्पष्टपणे दिसत आहे. ज्या अर्थी मोदींना १० ते ११ वर्षानंतर नागपुरात (Nagpur) जाऊन सरसंघचालकांना भेटावे लागले ही काही साधी गोष्ट नाही. नड्डा यांनी संघाची गरज नाही अशी भाषा केली होती. जेव्हा भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष बोलतो तेव्हा ती पंतप्रधान मोदींचीच भूमिका असते, असं संजय राऊत म्हणाले होते.