मुंबई | Mumbai
विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन (Budget Session) आजपासून सुरु झाले आहे. मात्र, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरुन गदारोळ झाल्याचे पाहायला मिळाले. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मंत्री माणिकराव कोकाटे यांना न्यायालयाने शिक्षा ठोठावली असून, त्यांच्या राजीनाम्यावर कारवाई का होत नाही, असा प्रश्न केला. त्यावरून सभापती, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये गोंधळ झाला. या गोंधळानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री कोकाटे यांच्या राजीनाम्याच्या निर्णयावर भाष्य केले.
यावेळी बोलतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की,” देशाचे माजी पंतप्रधान आणि ज्येष्ठ नेते या देशामध्ये ज्यांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक सुधारणा केल्या अशा मनमोहन सिंग यांच्या शोक प्रस्तावाच्या दिवशी असा गोंधळ होईल असे वाटले नव्हते. तथापी माननीय विरोधी पक्ष नेत्याला एवढचं सांगू इच्छितो की, आपण मंत्रिमहोदयासंदर्भात जे मांडत आहात. त्या संदर्भात कोर्टाने सुनावणी पूर्ण केलेली आहे. क्लोज फॉर ऑर्डर ठेवलेली आहे. कोर्टाची ऑर्डर आल्यावर सभागृह किंवा राज्यपाल (Governor) निर्णय घेतील”, असे त्यांनी म्हटले.
नेमकं प्रकरण काय आहे?
मंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे यांनी शासनाकडून ज्या सदनिका मिळतात त्या घेतल्या होत्या. त्यावेळी त्यांनी आमचे उत्पन्न कमी आहे, आम्हाला दुसरे घर नाही अशी माहिती शासनाला दिली होती. यानंतर शासनाकडून माणिकराव कोकाटे यांना सदनिका देण्यात आली. पण अधिकाऱ्यांनी यासंदर्भात नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात एकूण चार जणांचा आरोपी म्हणून उल्लेख करण्यात आला होता. मात्र कोर्टाने उर्वरित दोघांना कोणतेही शिक्षा सुनावलेली नाही. फक्त माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या भावाला दोन वर्षांची कारावासाची शिक्षा (Punishment) सुनावण्यात आली आहे.