मुंबई | Mumbai
काल राज्यभरात भारतीय जनता पक्षाचा (BJP) स्थापना दिवस उत्साहात साजरा झाला. यावेळी भाजप नेते आणि पदाधिकाऱ्यांनी ठिकठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. परंतु, भाजपच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने पक्षातील अंतर्गत गटबाजी देखील दिसून आली. भाजप आमदार किशोर जोरगेवार आणि सुधीर मुनगंटीवार यांनी स्वतंत्र कार्यक्रम घेतले. जोरगेवार यांच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या माजी मंत्री शोभाताई फडणवीस (Shobhatai Fadnavis) यांनी यावेळी भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे कान टोचले.
चंद्रपुरात मुनगंटीवार समर्थक आणि चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार (MLA Kishore Jorgewar) यांनी पक्षाच्या स्थापना दिवसाच्या निमित्ताने दोन स्वतंत्र कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यावेळी मुनगंटीवार यांनी श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयातल्या कार्यक्रमाला हजेरी लावली. मात्र, जोरगेवार यांच्या कार्यक्रमाला दांडी मारली. तर, जोरगेवार यांनी भाजप स्थापना दिनाचा कार्यक्रम कन्यका सभागृहात आयोजित केला होता. आमदार जोरगेवार यांच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काकू आणि माजी मंत्री शोभाताई फडणवीस, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांचा पक्षाच्या वाढीसाठी केलेल्या संघर्षासाठी सत्कार करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
यावेळी बोलताना शोभाताई फडणवीस म्हणाल्या की, “आपल्या पक्षाचे सरकार राज्यात आणि केंद्रात आहे. तेव्हा या जिल्ह्यातील पक्षात का भांडणे व्हावीत? याठिकाणी आज एवढा मोठा मेळावा आहे, त्यामुळे ते मोठ्या मनाने समोर का येत नाही. कशासाठी दुसरा मेळावा घेता? लोकांच्या मनामध्ये यामुळे काय निर्माण होते? आमदार जोरगेवार यांचा हा जिल्हा आहे. त्यांचे कार्यक्रम घेणे काम आहे. त्यामुळे खुलेपणाने सांगते, की सगळ्यांनी मोठेपणाने कार्यक्रमाला हजर राहणे गरजेचे होते. आपल्या पक्षात यायला लोकं तयार आहेत. त्यांची झुंबड वाढली आहे. जर आपली इथे भांडणं झाली, तर काँग्रेस झाली असं म्हणणार नाही?” असा सवाल देखील यावेळी त्यांनी केला.
दरम्यान, महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. विधीमंडळ अधिवेशनातही याचे संकेत दिसून आले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा चंद्रपूरमधील (Chandrapur) भाजप स्थापना दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पक्षातील गटबाजी दिसून आली.