मुंबई | Mumbai
काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पत्रकार परिषद घेत भाजप व निवडणूक आयोगावर (Election Commission) मत चोरीचा आरोप केला. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यानंतर आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा नोव्हेंबर २०२४ मधील महाराष्ट्रातील (Maharashtra) विधानसभा निवडणुकीनंतर एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीचा व्हिडिओ काँग्रेस नेत्यांनी ट्विट करत भाजपवर टीका केली आहे.
काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी “आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) साहेबांची कोणती चीप आणि डिस्क खराब झाली आहे? निवडणूक आयोगाची वकिली करणारे मुख्यमंत्री, भाजपा नेते गडकरींना जाब विचारणार का? मतचोरी होते, मतदारयादीत घोळ केले जातात याचा पुरावा आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिला. केंद्रीय मंत्री गडकरी यांनी गंभीर आरोप केला की त्यांच्या निवडणुकीत मतदारसंघातील (Constituency) ३,५०,००० नावे वगळण्यात आली. विशेष म्हणजे जी नावे वगळण्यात आली ते त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक होते. त्यांच्या भाच्याचे नावही वगळण्यात आले, असे गडकरी म्हणाले, असे सांगत त्यांनी भाजपावर हल्लाबोल केला आहे.
तसेच “केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जवळच्या लोकांची मत जर मतदार यादीतून गायब होत असतील तर इतरांचे काय? कुठे मतदार वाढवून दाखवले जात आहे तर कुठे मतदार गायब केले जात आहे, मतचोरीचा याहून मोठा पुरावा काय आहे? नितीन गडकरी यांच्याकडे निवडणूक आयोग आता प्रतिज्ञापत्र मागणार का? अजून पुरावे मागणार की माफी मागणार?” अशी विचारणाही विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
तसेच माजी मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी ” ये अंतर की बात, गडकरीजी सत्य के साथ. काँग्रेस नेते राहुलजी गांधी यांना खोटं ठरवू पाहणाऱ्या भाजपच्या अंधभक्तांनी हा व्हिडिओ (Video) पहावा. आतातर भाजपचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांनीच तुम्हाला उघडं पाडलंय. त्यांच्या स्वतःच्या नागपूर मतदारसंघात साडे तीन लाख मतदार (Voter) मतदार यादीतून वगळले गेल्याचे गडकरीजी सांगतायत. भाजपवालेहो, उघडा डोळे, ऐका नीट”, असे खोचक ट्विट त्यांनी केले आहे.
नितीन गडकरी नेमकं काय म्हणाले?
निवडणूक लढवत असताना साडेतीन लाख नावे, जे माझे मतदार आहेत, त्यांची नावे वगळण्यात आली, हे माझ्या लक्षात आले. या वगळलेल्या नावांत माझे नातेवाईक, कुटुंबातील सदस्य होते, असे अनेक लोक होते. ते माझ्याविरोधात षडयंत्र होते का, मला कमकुवत करण्यासाठी नावे वगळण्यात आली होती का, असे आरोप मी कुणावरही करणार नाही. परंतु, माझ्या मतदारसंघातील साडेतीन लाख लोकांची नावे वगळण्यात आली होती, हे सत्य आहे, असे नितीन गडकरी एका व्हिडिओमध्ये म्हणताना दिसत आहेत.




