मुंबई | Mumbai
राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांच्याकडे ओबीसी सर्टिफिकेट असल्याचा दावा काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार (MLA Vijay Wadettiwar) यांनी केला होता. त्यांच्या या विधानावर सुळे यांनी एक्स (ट्वीट) “माझ्याकडे कोणतेही ओबीसी किंवा कुणबी प्रमाणपत्र नाही. वडेट्टीवारांनी या दाव्याचा पुरावा द्यावा, अन्यथा जाहीर माफी मागावी. आम्ही गेल्या १२ वर्षांपासून काँग्रेससोबत असून आमचे आठ खासदार त्यांच्या सोबत आहेत. तरीही महाराष्ट्रातील काँग्रेस नेते वारंवार टार्गेट का करतात?” असा सवाल उपस्थित केला होता. त्यानंतर आता वडेट्टीवारांनी आपले वक्तव्य मागे घेतले असून, याबाबत त्यांनी एक्सवर पोस्ट केली आहे.
अनावधानाने उल्लेख झाला
विजय वडेट्टीवारांनी आपण केलेल्या विधानावर स्पष्टीकरण देताना म्हटले की,”ओबीसी प्रमाणपत्राच्या (OBC Certificate) संदर्भात माझी भूमिका मांडताना खासदार सुप्रिया सुळे यांच्या नावाचा अनावधानाने उल्लेख झाला. त्यामागे त्यांच्यावर कोणताही आरोप करण्याचा माझा हेतू नव्हता. अनावधानाने त्यांच्या नावाचा उल्लेख झाल्याबद्दल खेद व्यक्त करतो.मात्र, याचा अर्थ ओबीसी प्रमाणपत्र घेणाऱ्या मराठा नेत्यांबाबत माझी भूमिका बदललेली नाही. एकीकडे ओबीसी प्रमाणपत्र घेऊन सत्तेचा लाभ घ्यायचा आणि दुसरीकडे ओबीसी समाजाच्या हक्कांवर आघात करायचा, ओबीसींच्या पाठीत खंजीर खुपसायचा, या भूमिकेचे मी कधीही समर्थन करणार नाही.माझा संघर्ष कोणत्याही व्यक्तीविरोधात नसून ओबीसी समाजाच्या हक्कांच्या संरक्षणासाठी आणि सामाजिक न्यायासाठी आहे”, असे त्यांनी म्हटले आहे.
वडेट्टीवारांचे वक्तव्य आणि महाविकास आघाडीत तणाव
भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्यासह अनेक मराठा नेत्यांकडे आणि सुप्रिया सुळे यांच्याकडेही ओबीसी (कुणबी) प्रमाणपत्र असल्याचा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला होता. तसेच शरद पवारांकडे ओबीसी प्रमाणपत्र आहे की नाही, याची कल्पना नसल्याचे त्यांनी म्हटले होते.या विधानानंतर शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी वडेट्टीवारांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली.




