मुंबई | प्रतिनिधी | Mumbai
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे (Devendra Fadnavis) गृहखाते गेल्यापासून राज्यातील कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत. स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने (Kunal Kamra) केलेल्या विडंबन गीताने सरकार बिथरले असून आता कामराचा कार्यक्रम पाहिलेल्या प्रेक्षकांनाही नोटीस बजावण्यात आल्याचे समजते. त्यामुळे प्रेक्षकांना नोटीस पाठवणे हा राज्याला पोलीस स्टेट बनवण्याचा प्रयत्न आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांनी आज केली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना उद्देशून विडंबन गीत सादर करणाऱ्या कुणाल कामराचा कार्यक्रम पाहणाऱ्या काही प्रेक्षकांना मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) नोटीस बजावली आहे. या नोटीसच्या (Notice) माध्यमातून पोलीस प्रेक्षकांचा जबाब नोंदविणार असल्याचे समजते. या पार्श्वभूमीवर सपकाळ यांनी गृहखात्याच्या निर्णयावर टीकास्त्र सोडले आहे.
कुणाल कामराने एकनाथ शिंदे यांचे नाव घेतले नसतानाही त्यांच्या पक्षाने तोडफोड करणे, कामराला धमकी देणे असे प्रकार सुरु आहेत. प्रेक्षकांनी कार्यक्रम पाहिला यात त्यांचा काय दोष? कामराला धमकी देणारे, स्टुडिओची तोडफोड करणारे मोकाट आणि कार्यक्रम पाहणाऱ्यांना पोलीसांचा जाच हा कसला न्याय? महाराष्ट्राला पोलीस (Maharashtra Police) स्टेट बनवण्याचा हा उद्योग त्वरित थांबवावा. राज्यातील सरकारची कार्यपद्धती ही चोर सोडून संन्याशाला फाशी देणारी आहे, असे सपकाळ म्हणाले.
राज्यात भाजप (BJP) युतीचे सरकार येऊन तीन महिने झाले. या तीन महिन्यात बीड आणि परभणीत हत्या झाल्या. मुंबईत माजी मंत्र्याची हत्या झाली, सेलिब्रिटींना धमक्या येत आहेत. अभिनेता सैफ अली खानवर घरात घुसून जीवघेणा हल्ला झाला. स्वारगेटच्या बस स्थानकात महिलेवर बलात्कार झाला. राज्यात सेलिब्रिटीपासून सरपंचापर्यंत कोणीही सुरक्षित नाही. कोयता गँग, आका, खोक्या अशा गँग उघडपणे नंगानाच करत आहेत. पण गृहखाते आणि पोलीस विभाग ही गुन्हेगारी रोखू शकत नाही.
पुण्यासारख्या शहरापासून धाराशिव जिल्ह्यातील ग्रामीण भागापर्यंत ड्रग्ज खुलेआम विकले जाते, त्यावर आळा घालता येत नाही. देवेंद्र फडणवीस यांचा गृह खात्यावर वचक नाही. फडणवीसांचे पोलीस फक्त विरोधकांवर कारवाया करणे, विरोधकांचे फोन टॅप करणे, लोकशाही मार्गाने आंदोलन (Movement) करु न देणे व सामान्य नागरिकांना त्रास देण्याचे काम करत आहेत, अशी टीकाही सपकाळ यांनी केली.