मुंबई | Mumbai
गेल्या काही दिवसांपासून राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्याकडून वादग्रस्त विधाने केली जात आहेत. एक रुपया पीकविमा योजनेवरून शेतकऱ्यांची (Farmer) तुलना भिकाऱ्यांशी करणाऱ्या कोकाटे यांनी गेल्या आठवड्यात नाशिकमध्ये (Nashik) अवकाळी पावसामुळे द्राक्षबागांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली होती. त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना उद्देशून पीकविम्याचे पैसे मिळाले की साखरपुडा, लग्न उरकता असे वक्तव्य केले होते. या वक्तव्यावरून कोकाटे यांना मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले होते.
यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) मंगळवारी पक्षाच्या आमदारांच्या (MLA) झालेल्या बैठकीत आपल्या शैलीत समज दिल्याचे बोलले जात आहे. एकदा, दोनदा चूक झाली तर समजून घेऊ. मात्र तिसऱ्या वेळी चूक केल्यास माफी नाही तर मंत्रिपद बदलू असा इशारा अजित पवार यांनी कोकाटे यांना दिल्याचे समजते. मात्र पक्षाने कोकाटे यांना अशाप्रकारे कोणताही इशारा दिला नसल्याचे स्पष्ट करत हे वृत्त फेटाळून लावले आहे.
त्यानंतर आता कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी बालेवाडीतील शिवछत्रपती क्रीडा संकुलात आयोजित राज्यस्तरीय कृषी अधिकारी व कर्मचारी कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी बोलतांना कर्जमाफीच्या वक्तव्यावर खुलासा केला आहे. ते म्हणाले की, “मी हुशार किंवा मोठा माणूस नाही, सामान्य घरातून आलो आहे. त्यामुळे वागण्या-बोलण्यात चुका होऊ शकतात. मात्र, माझा हेतू प्रामाणिक आहे”, असे माणिकराव कोकाटे यांनी म्हटले आहे.
अजित पवारांचा संघटना बांधणीवर भर
राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी पक्षसंघटना मजबूत करण्यावर भर दिला आहे. त्यानुसार स्वतः अजित पवार आठवड्यातील चार दिवस राज्याच्या विविध भागांचा दौरा करणार आहेत. अजित पवार सोमवार ते बुधवार मुंबईत थांबून शासकीय कामकाज पाहणार आहेत. तर गुरुवार ते रविवार ते महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. विधानसभा आणि विधान परिषदेच्या आमदारांनाही त्यांनी दौऱ्याचे वेळापत्रक तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या दौऱ्यांच्या दरम्यान पदाधिकारी मेळावे, सदस्य नोंदणी, बूथ बांधणी आणि संघटन वाढवण्यावर भर दिला जाणार आहे.