मुंबई | Mumbai
महायुतीमधील (Mahayuti) राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत नाशिक आणि रायगडच्या (Nashik and Raigad) पालकमंत्रिपदावरून वाद सुरू आहे.रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदावर शिंदेंच्या शिवसेनेने (Shinde Shivsena) दावा केला आहे. ज्यावेळी राज्यातील इतर जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या (Guardian Minister) नावाची घोषणा झाली होती, त्यावेळी रायगडचे पालकमंत्रिपद हे आदिती तटकरे आणि नाशिकचे पालकमंत्रिपद गिरीष महाजन यांना देण्यात आले होते. पंरतु, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दोन्ही नावांना स्थगिती दिली होती.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदावरून नाराज झाल्यामुळे फडणवीसांनी महाजन आणि तटकरे यांच्या नावांना स्थगिती दिली होती. अशातच काल (शनिवारी) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) हे महाराष्ट्रातील (Maharashtra) रायगड दौऱ्यावर होते. या दौऱ्यात उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या मनातील नाराजी अमित शाह यांच्यासमोर बोलून दाखवत रायगडचा मुद्दा उपस्थित केला.
त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये दीर्घ चर्चा झाली. अमित शाह यांच्यासोबतच्या चर्चेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्री भरत गोगावले (Minister Bharat Gogawale) यांना भेटण्यासाठी मुंबईला बोलविले आहे. यानंतर एक कार्यक्रम अर्धवट सोडून मंत्री भरत गोगावले हे थेट मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी भरत गोगावले हे आग्रही आहेत. यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अमित शहा यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला असल्याचे बोलले जात आहे. तर नाशिकचा तिढा मात्र कायम आहे.
दरम्यान, शिंदेंच्या फोननंतर मंत्री गोगावले माध्यमांशी बोलतांना म्हणाले की, “पक्षाच्या (Party) कामासाठी शिंदेंनी बोलावले आहे. पक्षाच्या काही गोष्टी असतात, शेवटी पक्षबांधणी आणि पक्ष वाढवणे महत्वाचे आहे आणि जी काही जबाबदारी आमच्यावर दिली आहे ती आम्हाला पार पाडायची आहे”, असे त्यांनी म्हटले.