मुंबई | Mumbai
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीनंतर आता सत्तास्थापनेच्या घडामोडींना वेग आला आहे. विधानसभेचा कार्यकाळ आज संपतो आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.तसेच महाराष्ट्रात नवीन मुख्यमंत्री शपथ होईपर्यंत एकनाथ शिंदे हे काळजीवाहू मुख्यमंत्री असणार आहेत. काही वेळापूर्वी एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजभवन येथे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांची भेट घेतली. त्यानंतर शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा (Resignation) दिल्यानंतर महायुती सरकारकडून राज्यात नवीन सरकार स्थापन करण्याचा दावा राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्याकडे केला जाणार आहे. त्यानंतर राज्यपाल महायुती सरकारला नवीन सरकार स्थापन करण्यासाठी निमंत्रित करणार आहेत. त्यामुळे आता महायुतीचा (Mahayuti) पुढील मुख्यमंत्री कोण होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, महायुतीमध्ये भाजपने (BJP) सर्वाधिक १३२ जागा जिंकल्याने त्यांनी मुख्यमंत्रीपदावर दावा सांगितला आहे. भाजपच्या या मागणीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीने पाठिंबा दिला आहे. तर शिंदेंची शिवसेना नाराज असल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे भाजपकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे नाव आघाडीवर आहे. त्यामुळे ते राज्याचे पुढील मुख्यमंत्री होण्याची दाट शक्यता आहे.