धुळे | प्रतिनिधी | Dhule
काँग्रेसचे (Congress) माजी आमदार कुणाल पाटील हे सध्या भाजपच्या (BJP) संपर्कात असून, त्यांनी नुकतीच भाजप प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांची रायगड निवासस्थानी भेट घेतली. ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या (Local Body Election) पार्श्वभूमीवर कुणाल पाटील हे पक्षांतर करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघात (Dhule Rural Assembly Constituency) विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने (Mahavikas Aaghadi) काँग्रेसचे कुणाल पाटील यांना तिसऱ्यांदा संधी दिली होती.महायुतीने भाजपचे राम भदाणे यांना प्रथमच निवडणुकीच्या रिंगणात उतरविले होते. परंतु, राम भदाणे यांनी कुणाल पाटील यांचा पराभव करीत ६६ हजार ३२० मताधिक्क्यांनी विजय मिळवला होता. राम भदाणे यांना एक लाख ७० हजार ३९८ मते मिळाली होती. तर कुणाल पाटील यांना एक लाख चार हजार ७८ मते मिळाली होती.
दरम्यान, माजी आमदार कुणाल पाटील (Former MLA Kunal Patil) यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचा मोबाईल (Mobile) स्वीच ऑफ आल्याने अधिक माहिती समजू शकलेली नाही. परंतु, राजकीय (Political) वर्तुळात कुणाल पाटील भाजपत जाणार ही चर्चा मात्र रंगली आहे.




