मुंबई | Mumbai
लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) राज्यात महायुतीला मोठा फटका बसला तर विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाले. मात्र, यामध्ये महायुतीमधील (Mahayuti) भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेपासून काही मित्रपक्ष दुरावले गेल्याचे दिसून आले. यात माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेचा देखील समावेश होता. बच्चू कडू यांची प्रहार संघटना विधानसभा निवडणुकीआधी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत होती. मात्र, विधानसभा निवडणुकीवेळी जागावाटपात सन्मानजनक जागा न मिळाल्याने कडू यांनी महाविकास आघाडी किंवा महायुतीसोबत न जाता तिसरी आघाडी निर्माण करत निवडणूक लढविली. पंरतु, यात त्यांना फारसे यश आले नाही.
मात्र, अशातच आता माजी मंत्री बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे केंद्र सरकारमध्ये (Central Government) सत्तेत जाताना दिसतील, अशी शक्यता व्यक्त करत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांचा उल्लेख करत मोठा दावा केला आहे. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगल्या असून यावर मंत्री आशिष शेलार (Minister Ashish Shelar) यांनी प्रतिक्रिया देत त्यांचे हे विधान हास्यास्पद असल्याचे म्हटले आहे.
माजी मंत्री बच्चू कडू म्हणाले की, “आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे दोन ते तीन विधेयक पास होण्यासाठी भाजपाबरोबर अडकून राहिले आहेत. मात्र, त्या दोन ते तीन विधेयकांवर शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची कदाचित केंद्रातील भाजपा सरकारला गरज पडणार आहे. त्यामुळे राजकारणात मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता टाळता येत नाही”, असा दावा त्यांनी केला आहे.
तसेच “एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवारांची (Ajit Pawar) गरज भाजपासाठी संपलेली आहे. मोगल निती सध्या सुरू आहे. आपल्यापासून लांब चालला की त्याला कापायचा असे हे मुघलांचे बच्चे आहेत,” असे म्हणत कडू यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. तर मंत्री कोकाटे यांनी केलेल्या विधानावर बोलतांना कडू यांनी “राज्यात आलेले सरकार भ्रष्ट मार्गाने आले आहे म्हणून मंत्री उघडपणे भ्रष्टाचाराबाबत बोलत असतील तर त्यांचे अभिनंदन केले पाहिजे”, असे म्हणत त्यांनी कृषीमंत्र्यांना टोला लगावला.
आशिष शेलार काय म्हणाले?
माजी मंत्री कडू यांच्या विधानावर प्रत्युत्तर देताना शेलार म्हणाले की, “बच्चू कडू हे आमचे मित्र आहेत. मात्र, त्याचे हे विधान हास्यास्पद आहे. त्यांचे आडनाव कडू आहे गोड नाही, त्यामुळे त्यांनी अशा प्रकारचे हास्यास्पद विधान करू नये, असे त्यांनी म्हटले.