मुंबई । Mumbai
विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळालं, तर महाविकास आघाडीचा मोठा पराभव झाला. बहुमत मिळाल्यानंतर महायुतीच्या नेत्यांनी राज्यात सरकार स्थापनेसाठी हालचाली सुरु केल्या आहेत. विधानसभेचा निकाल लागून आज आठ दिवस होऊन गेले.
मात्र, अद्यापही महायुतीचं सरकार स्थापन होऊ शकलेलं नाही. भाजपकडून महायुती सरकारच्या शपथविधीची तारीख जाहीर केली. त्यानंतर आता सत्ता स्थापनेचा तिढा सोडवण्यासाठी मोठ्या हालचालींना वेग आला आहे. महायुतीच्या नेत्यांची येत्या काही तासात पुन्हा एकदा दिल्लीवारी होणार असल्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस व अजित पवार आज पुन्हा दिल्लीला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दिल्लीमध्ये अमित शाह आणि जेपी नड्डा यांच्यासोबत महाराष्ट्रातील तिन्ही वरिष्ठ नेत्यांची बैठक होणार असल्याची माहिती मिळत आहे. दिल्ली दौऱ्यात महायुतीमधील तिढा सुटणार का? याची चर्चा सुरू आहे. आज अमित शाह यांच्यासोबत पुन्हा बैठक होऊन अंतिम निर्णय होणार आहे. येत्या २४ तासांत खातेवाटपावर अंतिम शिक्कामोर्तब होईल, अशीही माहिती समोर येत आहे.
मागील आठवड्यातील गुरुवारी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची केंद्रीय गृहमंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांच्या निवासस्थानी रात्री उशिरापर्यंत चर्चा झाली होती. त्यानंतर भाजप आणि महायुतीची बैठक होणे अपेक्षित होते. या बैठका देखील झाल्या नाहीत. अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीत सरकार स्थापनेबाबतच्या काही महत्त्वाच्या गोष्टींवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली होती. एकनाथ शिंदे यांनी आपला प्रस्ताव अमित शाह यांच्यासमोर सादर केला होता.