Friday, September 25, 2026
HomeराजकीयMaharashtra Politics : राज्यात पुन्हा राजकीय भूकंप? शरद पवार गट महायुतीसोबत सत्तेत...

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा राजकीय भूकंप? शरद पवार गट महायुतीसोबत सत्तेत सामील होणार?

मुंबई । Mumbai

महाराष्ट्र राजकीय वर्तुळातून एक अत्यंत मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘ऑपरेशन टायगर’मुळे राज्याच्या राजकारणात उडालेली खळबळ अद्याप शांत झालेली नसतानाच, आता आणखी एका मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत मिळत आहेत. मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये घडलेल्या एका गुप्त भेटीमुळे महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाला एक पूर्णपणे नवे वळण मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) गटाचे ज्येष्ठ नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यात मुंबईतील एका अलिशान हॉटेलमध्ये शुक्रवारी एक महत्त्वाची बैठक पार पडली. या दोन बड्या नेत्यांच्या अचानक झालेल्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत अत्यंत संवेदनशील विषयांवर चर्चा झाली. जर शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीमध्ये सामील झाला, तर भविष्यात पक्षाला कोणती पदे आणि वाटा मिळू शकतो, यावर प्राथमिक खल झाल्याचे समजते. या बैठकीनंतर जयंत पाटील यांनी पक्षाच्या एका अत्यंत वरिष्ठ नेत्यासोबतही चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे. महायुतीत सामील होण्याबाबत पक्षाची नेमकी भूमिका काय असावी, यावर चाचपणी सुरू असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. या संदर्भात स्वतः जयंत पाटील यांनी विनोद तावडे यांच्याशी भेट झाल्याची कबुली दिली असली, तरी ही भेट केवळ ‘अनौपचारिक’ होती असा दावा त्यांनी केला आहे.

काही महिन्यांपूर्वी अजित पवार हयात असताना दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलीनीकरणाची जोरदार चर्चा रंगली होती. दोन्ही गट एकत्र आल्यास ते एनडीए (NDA) सोबत जाणार की ‘इंडिया’ (INDIA) आघाडीसोबत राहणार, हा प्रश्न राजकीय विश्लेषकांसाठी कळीचा ठरला होता. मात्र, अजित दादांच्या अपघाती निधनामुळे हा प्रश्न अनुत्तरितच राहिला. आता जयंत पाटील आणि तावडे यांच्या भेटीमुळे शरद पवार गट महायुतीच्या दिशेने पावले टाकत आहे का? अशा चर्चांना बळ मिळाले आहे.

सध्याच्या घडीला राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडे लोकसभेत मजबूत फळी आहे. या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या लोकप्रतिनिधींवर सर्वांचे लक्ष लागून आहे. या बड्या नेत्यांची आणि खासदारांची फौज सोबत असताना शरद पवार आगामी काळात काय निर्णय घेतात आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला कोणती नवी दिशा मिळते, हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. या संभाव्य समीकरणांमुळे महायुती आणि विरोधी आघाडीत प्रचंड अस्वस्थता पसरली आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे गणित गुंतागुंतीचे

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळातील 21 जागांसाठी निवडणूक होणार असल्याने जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील राजकीय गणिते पुन्हा एकदा चर्चेत आली आहेत. दरम्यान,...