मुंबई | Mumbai
मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या नेतृत्त्वाखाली मराठा आंदोलकांनी आझाद मैदानावर मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळावे, हैदराबाद गॅझेटियर लागू करावे यासाठी आंदोलन केले होते. त्यानंतर सरकारने याची दखल घेत मराठा आरक्षणासंदर्भात एक शासन आदेश (GR) जारी केला होता. त्यामध्ये हैदराबाद गॅझेटियर लागू करण्यासोबतच पात्र मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आला होता.
मात्र सरकारच्या या निर्णयामुळे ओबीसी समाजामध्ये (OBC Community) तीव्र नाराजी पसरली आहे. या शासन आदेशाविरोधात मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आक्रमक भूमिका घेत येत्या दोन दिवसांमध्ये मुंबई उच्च न्यायालयात मराठा समाजासाठी काढण्यात आलेल्या जीआर विरोधात याचिका दाखल करणार असल्याचे म्हटले आहे. यानंतर आता छगन भुजबळांच्या या भूमिकेवर मनोज जरांगे यांनी माध्यमांशी बोलतांना प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी ते म्हणाले की, “आमच्या जीआरला (GR) खोड करून अडचणी आणल्यास त्यांना महाराष्ट्रात येऊ देणार नाही. आम्हाला कुणबीतून आरक्षण पाहिजे. वेळ आल्यावर जशाच तसे उत्तर देऊ. जर सरकारने येवल्यावाल्याचे (छगन भुजबळ) यांचे ऐकून जीआरमध्ये हेराफेरी केली तर १९९४ चा जीआर आम्ही देखील चॅलेंज करू आणि तो सुद्धा रद्द करावा लागणार आहे” असे जरांगे यांनी म्हटले.
पुढे ते म्हणाले की, “तुम्ही जर आमच्या मुळावर उठणार असाल तर आम्ही देखील तुमच्या मुळावर उठू. हैदराबाद गॅझेटीयर प्रमाणे प्रमाणपत्र देण्यास सुरू करा, मनुष्यबळ द्या अन्यथा नाईलाजाने मला वेगळा निर्णय घ्यावा लागेल. असा इशाराच मनोज जरांगेंनी दिला. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मराठ्यांचा रोष ओढवून घेणार नाहीत, असेही त्यांनी म्हटले.




