मुंबई | Mumbai
समाजवादी पार्टीचे नेते (Samajwadi Party Leader) व मानखुर्द-शिवाजीनगरचे आमदार अबू आझमी (Abu Azmi) यांनी मुघल शासक ‘औरंगजेब हा क्रूर प्रशासक नव्हता’ असे वक्तव्य केले होते. त्यानंतर आता त्यांना हे वक्तव्य चांगलेच अंगलट आले आहे.
आज भाजपा व शिवसेना (शिंदे) आमदारांनी विधानसभेत (Vidhansabha) या वक्तव्यावरून गोंधळ घातला. यावेळी अबू आझमी यांनी माफी मागावी अशी मागणी देखील केली. त्यानंतर भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी आझमी यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडला. यानंतर अबू आझमी यांना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी अधिवेशन संपेपर्यंत निलंबित (Suspended) करत असल्याची घोषणा केली.
अबू आझमी काय म्हणाले होते?
:मी औरंगजेबाला क्रूर शासक मानत नाही. औरंगजेबने त्याच्या कारकिर्दीत अनेक हिंदू मंदिरे बांधली. तो एक महान राजा होता. त्याच्या काळात भारत ‘सोने की चिड़िया’ होता. त्याची राजवट पाहूनच इंग्रज भारतात आले होते. तो न्यायप्रेमी सम्राट होता. आम्हाला चुकीचा इतिहास दाखवला जात आहे. वाराणसीमध्ये औरंगजेबाच्या एका सरदाराने पंडिताच्या मुलीशी जबरदस्तीने लग्न करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा औरंगजेबाने त्याला हत्तीच्या पायाखाली चिरडले होते. औरंगजेबाची कबर खोदण्याची भाषा करणारे भाजप नेते जातीय सलोखा बिघडवत आहेत” असे अबू आझमी म्हणाले होते.
पडसाद उमटल्यानंतर अबू आझमींची माघार
अबू आझमी यांनी केलेल्या विधानाचे पडसाद अर्थसंकल्पीय अधिवेशनातही उमटले होते. यानंतर दोन्हीही सभागृहात अबू आझमी यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला होता. तसेच त्यांच्या या विधानानंतर अबू आझमींच्या राजीनाम्याची मागणी जोर धरु लागली होती. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अबू आझमी यांच्या निलंबनाची मागणी केली. यानंतर अबू आझमी यांनी एक व्हिडीओ शेअर करत केलेले विधान मागे घेत असल्याचे म्हटले होते.