मुंबई | Mumbai
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) हे त्यांच्या विधानांमुळे कायम चर्चेत असतात. या विधानांवरून त्यांना पक्षश्रेष्ठींकडून तंबी देखील देण्यात आली आहे. त्यामुळे सध्या कोकाटे यांची ही विधाने थांबल्याची बघायला मिळत आहे. मात्र, आता कृषिमंत्री माणिकराव कोकाटे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमुळे पुन्हा राज्यभर चर्चेत आले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांचा एक व्हिडीओ ‘एक्स’वर शेअर करत काही मजकूर देखील पोस्ट केला आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “जंगली रमी पे आओ ना महाराज! सत्तेतल्या राष्ट्रवादी (NCP) गटाला भाजपला (BJP) विचारल्याशिवाय काहीच करता येत नाही. म्हणूनच शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित असताना, राज्यात रोज आठ शेतकरी आत्महत्या (Suicide) करत असताना सुद्धा काही कामच नसल्याने कृषिमंत्र्यांवर रमी खेळण्याची वेळ येत असावी. असे रोहित पवार पोस्टमध्ये म्हणाले आहेत.
तसेच रस्ता (Road) भरकटलेल्या या मंत्र्यांना आणि सरकारला पिकविमा-कर्जमाफी-भावांतरची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांची “कभी गरीब किसानो कीं खेतीपर भी आओ ना महाराज” ही आर्त हाक ऐकू येईल का? असा सवाल रोहित पवारांनी पोस्टच्या माध्यमातून विचारला आहे. त्यामुळे आता या व्हिडीओवर कृषिमंत्री माणिकराव कोकाटे काय स्पष्टीकरण देतात हे बघणे, महत्त्वाचे ठरणार आहे.
सुधीर मुनगंटीवार यांनी टोचले कान
भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, “आमदार, मंत्री म्हणून आपण मर्यादा ठेवाव्यात. आपले वर्तनाने चुकीचा संदेश जाऊ नये. याविषयीची एथिकल कमिटी-नैतिक समिती निश्चितच भूमिका घेईल. कारण हा प्रकार सभागृहात झाला आहे. हा व्हिडिओ मी पाहिलेला नाही. पण राज्यात आमदारांच्या चुकीच्या वर्तवणुकीवर नैतिक समिती निर्णय घेईल. सभागृहात अशा प्रकारची कोणतीही घटना होऊ नये, याची सर्वांनी काळजी घ्यावी, असे त्यांनी म्हटले.





