मुंबई | Mumbai
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या उपस्थितीत आज मुंबईत मनसेच्या (MNS) १९ व्या वर्धापन दिनानिमित्त मेळावा पार पडला. यावेळी त्यांनी मनसेसैनिकांना मार्गदर्शन करताना विविध विषयांवर भाष्य केले.
यावेळी बोलतांना राज ठाकरे म्हणाले की,” मनसेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या कामकाजाचा लेखाजोखा केला जाणार आहे. प्रत्येक पंधरा दिवसाला आढावा घेणार असून जर पदाधिकाऱ्याने कामचुकारपणा केल्याचे आढळले तर मी पदावरून हकालपट्टी करणार आहे. मग त्याला ज्या फुटपाथवर (पक्षात) जायचे आहे, त्या फुटपाथवर त्याने जावे”, असे त्यांनी म्हटले.
पुढे ते म्हणाले की,” मी सर्व गोष्टींवर सविस्तर गुढीपाडव्याच्या (Gudi Padwa) दिवशी बोलणार आहे. मात्र, तुम्हाला गुमराह करण्यासाठी सोशल मीडियातून जातीपातीचे विषय काढून तुमची डोकी जाणूनबुजून भडकावली जात आहेत.कालच महिला दिन झाला. दरवर्षी ८ मार्चला महिला दिन सुरू करतो. काल मला एकाने विनोद पाठवला. म्हणे २१ जून सर्वात मोठा दिवस समजला जातो. हे सर्व खोटे आहे. २१ जून सर्वात मोठा दिवस नाही. महिला दिन सर्वात मोठा दिवस आहे. कारण तो ८ मार्चला सुरु होतो आणि पुढच्या वर्षी ७ मार्चला संपतो. ज्यांची लग्न झाली असेल त्यांना कळत असेल मी काय म्हणतो. आपल्याकडे दोन पुरुष एकत्र आले तरी महिला दिनाच्या शुभेच्छा देतात. अरे यात महिला कुठे आहे. मागचा पुढचा विचार नाही, बस शुभेच्छा. महिला दिनाच्या शुभेच्छा देतो. पण एका सर्वात मोठ्या महिलेचा विसर पडून देतो. त्या महिलेला विसरतो. हा महिला दिन खरंतर राजमाता माँ जिजाऊ साहेबांच्या नावाने ओळखला पाहिजे”, असे राज ठाकरेंनी म्हटले.
यावेळी राज ठाकरेंनी प्रभू रामचंद्रांना झालेल्या १४ वर्षांच्या वनवासाचे उदाहरण देतांना सत्ताधाऱ्यांना चिमटा काढला. ते म्हणाले की,” प्रभू रामचंद्रांना हनुमान भेटला. ते लंकेत गेले कुंभकर्णाला मारलं. रावणाला मारलं. सीतामाईला घेऊन आयोध्येला आले. मध्ये त्यांनी एक सेतू बांधला. हे त्यांनी १४ वर्षात केले. आणि वांद्रे वरळी सी लिंक आपण १४ वर्षात बांधला. कुठे आयोध्या, दंडकारण्य, कुठे लंका सेतूबितू बांधून गेले. असे सांगत त्यांनी आजच्या काळात वांद्रे वरळी सी लिंकला (Bandra to Worli Sea Link) १४ वर्षे लागल्यावरून जोरदार फटकेबाजी केली.
गुढीपाडव्याला दांडपट्टा चालवणार
२० दिवसांवर गुढी पाडव्याचा मेळावा आहे. तिकडे मी दांडपट्टा फिरवणार असेल तर आता चाकू सुरे कशाला काढू, असा सूचक इशारा राज ठाकरे यांनी दिला. तसेच ११ मार्चला सर्वांना जबाबदाऱ्या देणार असल्याचे सांगत यावर मी आताच काही गोष्टी स्पष्ट बोलू शकत नाही आणि मी बोलणारही नाही, असेही राज ठाकरे यांनी सांगितले.