मुंबई | Mumbai
शिवसेना ठाकरे गटाचे (Shivsena UBT) राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. राऊत यांनी त्यांच्या ‘नरकातील स्वर्ग’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाचे निमंत्रण देण्याकरता शरद पवारांची भेट घेतली. त्यानंतर या संदर्भातील माहिती शरद पवारांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून दिली आहे.
शरद पवारांनी संजय राऊतांनी भेट (Meet) घेतल्यानंतर त्यांच्या या भेटीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यामध्ये शरद पवार म्हणाले की,”राज्यसभेचे खासदार (MP) संजय राऊत यांनी आज माझ्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. या भेटीच्या वेळी त्यांनी आपल्या लेखणीतून साकारलेल्या ‘नरकातील स्वर्ग’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाचे औपचारिक निमंत्रण दिले. या भेटीदरम्यान रोहन तावरे यांनी लिहिलेल्या वन्यजीवनावर आधारित पुस्तकावर सविस्तर चर्चा झाली. त्याचप्रमाणे, राज्य व देशातील विविध मुद्द्यांवरही विचारमंथन झाले. भेटीनंतर मी त्यांना त्यांच्या पुढील कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या”, असे त्यांनी म्हटले आहे.
राज्यसभेचे खासदार तसेच शिवसेनेचे नेते श्री. संजय राऊत यांनी आज माझ्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. या भेटीच्या वेळी त्यांनी आपल्या लेखणीतून साकारलेल्या ‘नरकातील स्वर्ग’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाचे औपचारिक निमंत्रण दिले.
या भेटीदरम्यान रोहन तावरे यांनी लिहिलेल्या… pic.twitter.com/yLclxGefxL
— Sharad Pawar (@PawarSpeaks) May 4, 2025
दरम्यान, संजय राऊत यांनी लिहिलेल्या ‘नरकातील स्वर्ग’ या पुस्तकाचे प्रकाशन येत्या १७ मे रोजी रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी येथे होणार आहे. या कार्यक्रमास ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (NCP SP) अध्यक्ष शरद पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तर कवी आणि पटकथा लेखक जावेद अख्तर यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे.
याला बदला म्हणतात का?
संजय राऊत यांनी आज (रविवारी) सकाळी माध्यमांशी बोलतांना पहलगाम हल्ल्यावरून केंद्र सरकारवर (Central Government) टीका केली. ते म्हणाले की, “पहलगाम हल्ल्याला १२ दिवस होऊन गेले आहेत. याचा बदला काय घेतला, या नाड्या आवळल्या, त्या नाड्या सोडल्या, पाकिस्तानचे २१ युट्यूब चॅनल बंद केले. पाकिस्तानच्या हायकमिशनमधील कर्मचारी वर्ग कमी केला, याला बदला घेणं म्हणतात का? तुम्ही तुमच्या राजकीय विरोधकांचा बदला कसा घेता? त्यांचे पक्ष फोडून टाकता, त्यांना तुरुंगात टाकता. त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करता, त्यांच्या कुटुंबाचा छळ करता. बदला घेता ना, आपल्यासमोर आपला कोणताही राजकीय शत्रू नको. संपवून टाकायचे. मग पाकिस्तानच्या बाबतीत एअरस्पेस बंद केली, युट्यूब चॅनल बंद केले, याला बदला घेणे म्हणतात का? असा संतप्त सवाल राऊतांनी विचारला.