मुंबई | Mumbai
सध्या दिल्लीत ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरु आहे. या साहित्य संमेलनाच्या ‘असे घडलो आम्ही’ या कार्यक्रमात बोलतांना शिंदेंच्या शिवसेनेच्या (Shinde Shivsena) नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी “ठाकरे गटामध्ये दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचे “,असे म्हणत मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे गोऱ्हे यांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
यावेळी बोलतांना गोऱ्हे म्हणाल्या की,”कार्यकर्त्यांना कमी समजण्याचं कारण नाही. २०१२ ते २०१४ पर्यंतचे शेवटचे शिवाजी पार्कवरील सगळ्या कार्यक्रमाची तयारी त्यांचेच (एकनाथ शिंदे) लोक करायचे. प्रत्येक सभेला ठाण्यातून लोकं यायची आणि तेच सगळी तयारी करायचे. गल्ला गोळा करण्याचे काम त्यांना (शिंदेंना) दिलं होतं. (उबाठांच्या शिवसेनेमध्ये) दोन मर्सिडीज दिल्या की एक पदं मिळायचे”, असा सनसनाटी आरोप त्यांनी केला. तसेच ठाकरेंच्या शिवसेनेतील (Shivsena) नेत्यांनाचं आम्ही नको झालो होतो”, असेही नीलम गोऱ्हे यांनी म्हटले.
पुढे त्या म्हणाल्या की, “२०१९ ला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री झाल्यावर आम्हालाही धन्य वाटलं होतं. बाळासाहेबांचा मुलगा मुख्यमंत्री झाला, पण आम्हाला हे माहित नव्हतं की आमदारांनाही भेटी मिळणार नाहीत. कुठल्याच विषयाला भेटी मिळणार नाही, दिवसातून दोन ते तीन वेळा आरटीपीसीआर केली तरी भेट नाही. या गोष्टीचा विचार केल्यावर स्थित्यंतर होतात यामागे अनेक गोष्टी असतात”, असंही नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.
नीलम गोऱ्हे यांच्या आरोपांवर उद्धव ठाकरे काय म्हणाले?
अहिल्यानगर काँग्रेसचे अध्यक्ष किरण काळे यांनी आज मातोश्री येथे शिवसेना ठाकरे पक्षात प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यादरम्यान नीलम गोऱ्हे यांनी मर्सिडीजबाबत केलेल्या विधानाबाबत उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारण्यात आले. त्यावर बोलतांना ते म्हणाले की,” मी त्याकडे लक्ष देत नाही. एक महिला म्हणून त्यांचा आदर आहे. त्यांनी राजकारणात त्यांचं चांगभलं केलं आहे. गद्दार सेनेत गेलेल्या लोकांवर मी बोलत नाही. त्यांच्या लेखी शिवसेना संपवली असे त्यांना वाटत असेल. पण माझी जुनी माणसे, निष्ठावान माणसे माझ्यासोबत आहेत, असे त्यांनी म्हटले. तसेच नीलम गोऱ्हे यांना ४ वेळा आमदार केले. त्यांनी किती मर्सिडिज दिल्या? ८ मर्सिडिज दिल्या का?, त्याच्या पावत्या त्यांनी आणून दाखवाव्यात, असे खासदार संजय राऊत म्हणाले.