मुंबई | Mumbai
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात (Santosh Deshmukh Murder Case) धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचा राजीनामा झाल्यानंतर आता अजित पवार गटाचे दुसरे मंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्या राजीनाम्यासाठी महायुती सरकारवर दबाव वाढला आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याने आत्मविश्वास दुणावलेल्या विरोधी पक्षाकडून आता माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली जाणार आहे.
बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय कोट्यातील सदनिका लाटल्याप्रकरणी माणिकराव कोकाटे यांना नाशिक सत्र न्यायालयाने (Court) दोन वर्षांचा कारावास आणि ५० हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. या शिक्षेला अद्याप वरिष्ठ न्यायालयाने स्थगिती दिली नसली तरी माणिकराव कोकाटे मंत्रिपदावर (Ministership) कायम आहेत. आधीच्या सरकारने जो न्याय सुनील केदार यांना लावला तोच न्याय माणिकराव कोकाटे यांना लावावा, अशी विरोधी पक्षाची मागणी आहे. या मागणीचे पडसाद आज, बुधवारी अधिवेशनात उमटण्याची शक्यता आहे.
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी मुंडे आणि कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी जोरदार घोषणाबाजी केली. यानंतर सोमवारी रात्री संतोष देशमुख यांच्या क्रूर आणि अमानवीय हत्येची छायाचित्रे समाज माध्यमात व्हायरल झाली. त्याची परिणीती मुंडेंच्या राजीनाम्यात झाली. हा राजीनामा (Resignation) झाल्यानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी धनंजय मुंडे यांच्यानंतर आता कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा नंबर असल्याचा इशारा दिला.
माणिकराव कोकाटे यांना अजित पवारांचे पूर्ण पाठबळ आहे. कोकाटे यांनी नाशिक न्यायालयाच्या (Nashik Court) निर्णयाला आव्हान दिले असून त्यावर आज, बुधवारी सुनावणी अपेक्षित आहे. या सुनावणीत कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती मिळाली नाहीतर त्यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि माणिकराव कोकाटे यांचे लक्ष न्यायालयाच्या सुनावणीकडे लागले आहे. मुंडे यांच्या राजीनाम्यामुळे महायुती सरकार (Mahayuti Government) बॅक फुटवर गेल्याने विरोधकांचा आत्मविश्वास वाढला आहे. अशावेळी न्यायालयाने कोकाटे यांना दिलासा दिला नाहीतर दुसरी विकेट काढण्याची रणनीती विरोधकांनी आखली आहे.