ठाणे | Thane
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राज्यभरातील पदाधिकाऱ्यांचा मेळावा आज (रविवारी) ठाण्यात (Thane) पार पडला. या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना राज्यातील विविध राजकीय व सामाजिक मुद्द्यांवर पक्षाची स्पष्ट भूमिका मांडली.
यावेळी ते म्हणाले, “सध्या देशात सर्वत्र धर्माची एकप्रकारची ‘झिंग’ आणली जात आहे. नागरिकांचे (Citizen) मूळ प्रश्नांवरून दुर्लक्ष व्हावे यासाठीच सोशल मीडियाच्या माध्यमातून असा राग पसरवला जात आहे. प्रत्येकाने धर्माभिमानी असले पाहिजे, परंतु धर्मांध असणे योग्य नाही. रावणाला १० तोंडे होती एवढेच मला ठाऊक आहे; परंतु काही लोक रावणाला १ लाख मुले व दीड लाख नातू असल्याचा दावा करत सुटतात, असे म्हणत राज ठाकरेंनी भस्म लावून आणि चुकीची माहिती पसरवून समाजात भोंदूगिरी करणाऱ्यांवर टीका केली.
पंतप्रधानांच्या फोटो वादावर स्पष्टीकरण
काही दिवसांपूर्वी पुण्यातील (Pune) एका महाविद्यालयात अमित ठाकरे यांनी केलेल्या आंदोलनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवण्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. या संपूर्ण प्रकरणावर राज ठाकरे यांनी आज भाष्य केले.ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर किंवा महात्मा फुले यांच्या रांगेत कोणीही बसू शकत नाही. शासकीय कार्यालये आणि न्यायालयांमध्ये पंतप्रधानांचा फोटो असायलाच हवा, परंतु तो महापुरुषांच्या रांगेत न ठेवता दुसऱ्या भिंतीवर लावायला हवा. ही चूक सर्वांनी वेळीच सुधारून घ्यावी”, असे त्यांनी म्हटले.
जीडीपीच्या मुद्द्यावरून मोदींवर टीका
यावेळी राज ठाकरे यांनी सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (GDP) मुद्यावरुन नरेंद्र मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, “पंतप्रधान परदेशातून भारतीयांना सांगतात की परदेशात फिरायला जाऊ नका आणि सोनं खरेदी करू नका. जर देशाचा जीडीपी वृद्धी दर ७.८ टक्के आहे आणि आपण अमेरिका-चीनपेक्षा पुढे आहोत, तर मग नागरिकांवर ही काटकसर करण्याची वेळ का येत आहे? घरामध्ये चणचण असते तेव्हाच काटकसर सुरू होते,” असा टोला त्यांनी लगावला. तसेच नीट (NEET) परीक्षेतील घोटाळ्याप्रकरणी सध्या ‘जेन झी’ (Gen Z) तरुण रस्त्यावर उतरले आहेत. देशाची वाटचाल कुठे सुरू आहे याचा गांभीर्याने विचार केला नाही, तर उद्या अख्खा देश रस्त्यावर येईल, असा इशारा त्यांनी दिला.
५०३ परदेशी कंपन्या बंद; रोजगाराचा गंभीर प्रश्न
पुढे राज ठाकरे म्हणाले की,”२०२१ ते २०२६ या काळात भारतात आलेल्या परदेशी कंपन्यांपैकी तब्बल ५०३ कंपन्यांनी आपले कामकाज बंद केले आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या गेल्या आहेत. हा डेटा केंद्रीय कारपोरेट अफेयर्स मंत्रालयाचा (Ministry of Corporate Affairs) असून तो व्हॉट्सअॅपवरून आलेला नाही, असा मिश्किल चिमटा त्यांनी काढला. सत्ताधारी पक्षाचे समर्थक वस्तुस्थिती नाकारून केवळ वरून आलेल्या व्हॉट्सअॅप संदेशांच्या आधारे स्वतःची समजूत काढत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.
शेतकरी आणि विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांवरून सरकारवर टीकास्त्र
राज ठाकरे म्हणाले की, “आज या देशात दर ४८ मिनिटाला एक शेतकरी आत्महत्या (Farmer Suicide) करतोय! एवढंच नाही तर उच्च शिक्षण घेणारी तरुण मुलं आत्महत्या करत आहेत. ही देशातील खरी परिस्थिती आहे. मग तुम्ही काय दात काढलेले नाग आहात का? समोरचे धर्माची पुंगी वाजवतायत अन् तुम्ही नाचताय?” असे त्यांनी म्हटले.
डीजेच्या वादावर काय म्हणाले?
पुण्यातील डीजेच्या वादाचा उल्लेख करत राज ठाकरेंनी राज्य सरकारवरही सडकून टीका केली. ते म्हणाले,”पुण्यात डीजेचा वाद सुरू आहे, त्यावर मुख्यमंत्री काय बोलले ते मला आजपर्यंत कळालेच नाही.मुख्यमंत्री बोलतायत की कायद्याने आम्हाला काहीही करता येत नाही. मग मला सांगा, नागपुरात डीजे कसा बंद झाला? नागपुरात बंद होतो, मग पुण्यात का नाही? असा सवाल त्यांनी केला. तसेच माझ्या घरी दीड दिवसांचा गणपती येतो, मुलांच्या आग्रहामुळे घरी गणपती येतो. मात्र, दीड दिवसानंतर त्याचे विसर्जन केल्यावर घरातील उत्साह निघून जातो. मग, गणपतीला निरोप देताना तुम्ही एवढा धांगडधिंगा करून कसा काय निरोप देता? असा सवालही राज ठाकरेंनी केला.




