Tuesday, September 29, 2026
Homeब्रेकिंग न्यूजThackeray Brothers Press : निवडणूक आयुक्तांविरोधात ठाकरे बंधूंचा मुंबईत एल्गार; ४ ऑक्टोबरला...

Thackeray Brothers Press : निवडणूक आयुक्तांविरोधात ठाकरे बंधूंचा मुंबईत एल्गार; ४ ऑक्टोबरला मोर्चा कुठून निघणार? राज ठाकरेंनी दिली महत्त्वाची माहिती

मुंबई | Mumbai

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार (Dnyanesh Kumar) यांच्या कथित मनमानी कारभाराविरोधात आणि निवडणूक घोटाळ्याच्या (Election Scam) आरोपांवरून देशासह राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. याविरोधात आता ‘ठाकरे बंधूंनी’ (उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे) थेट रणांगणात उतरण्याचा निर्णय घेतला असून, येत्या ४ ऑक्टोबर रोजी मुंबईत भव्य संयुक्त महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

- Advertisement -

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांच्या संयुक्त विद्यमाने हा महामोर्चा (Morcha) काढला जाणार आहे. निवडणूक आयोगातील कथित दुफळी, दोन आयुक्तांनी मुख्य निवडणूक आयुक्तांच्या कारभारावर घेतलेले आक्षेप आणि देशभरात निर्माण झालेला असंतोष या पार्श्वभूमीवर विरोधकांनी ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. काँग्रेसच्या राज्यव्यापी आंदोलनानंतर आता ठाकरे बंधूंच्या या संयुक्त मोर्चाने सरकारविरोधी आंदोलनाला मोठे बळ मिळण्याची शक्यता आहे.

या महामोर्चाच्या अंतिम रूपरेषेबाबत आज (मंगळवारी) मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत घेतली. या पत्रकार परिषदेत ठाकरे बंधूंनी मोर्चाचा अंतिम मार्ग, वेळ आणि इतर महत्त्वाच्या तपशिलांची घोषणा केली. हा मोर्चा भायखळा येथील रिचर्डसन अँड क्रुडास कंपनीपासून सुरुवात होणार असून, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) समोरील मुंबई महापालिका (BMC) मुख्यालयाजवळ सांगता होईल, अशी माहिती राज ठाकरेंनी (Raj Thackeray) पत्रकार परिषदेत दिली.

पक्षाचे झेंडे नाही, केवळ तिरंगा; राज ठाकरेंचे स्पष्ट निर्देश

या मोर्चाचे स्वरूप स्पष्ट करताना राज ठाकरे म्हणाले की, “हा कोणत्याही एका राजकीय पक्षाचा मोर्चा नसून लोकशाही आणि संविधान वाचवण्याचा लढा आहे. त्यामुळे या मोर्चात मनसे किंवा शिवसेनेचे (ठाकरे गट) पक्षाचे झेंडे आणले जाणार नाहीत; केवळ ‘तिरंगा’ फडकवला जाईल. तसेच कोणत्याही पक्षाच्या वैयक्तिक घोषणा दिल्या जाणार नाहीत. याशिवाय, सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांना पत्राऐवजी थेट फोन करून या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

जे बोलू ते ४ तारखेलाच!

पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देणे टाळत राज ठाकरे म्हणाले की, “आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून मतदानातील घोळाबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रारी करत आहोत, मात्र त्याची दखल घेतली गेली नाही. हा मोर्चा आमच्यासह सर्व मतदारांच्या अपमानाचा बदला आहे. त्यामुळे यावर जे काही सांगायचे आहे, ते आम्ही ४ तारखेच्या सभेतच बोलू,” असे त्यांनी म्हटले.

राज ठाकरेंच्या कृतीने वेधले लक्ष

पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वी राज ठाकरे यांनी मनसे नेते अविनाश जाधव यांच्याकडून मोबाईल घेतला, कॅमेरा सुरू केला आणि उपस्थित सर्व पत्रकारांचे फोटो स्वतःच्या मोबाईलमध्ये कैद केले. राज ठाकरेंच्या या अनपेक्षित आणि हलक्या-फुलक्या कृतीने पत्रकार परिषदेत काही काळ उत्सुकता व हशा पिकला.

पुन्हा एकदा ठाकरे बंधू एकत्र

यापूर्वी नीट (NEET) पेपरफुटी प्रकरण आणि सीजेपी आंदोलनादरम्यान दादरच्या शिवाजी पार्क येथील मोर्चात दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले होते. त्या आंदोलनात तरुण (Gen-Z) मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आता निवडणूक आयोगाच्या कथित घोटाळ्याविरोधात ठाकरे बंधू पुन्हा एकदा एकाच व्यासपीठावर येत असल्याने या महामोर्चाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

असा असेल महामोर्चाचा मार्ग आणि वेळ

तारीख व वेळ : ४ ऑक्टोबर, सकाळी १० वाजता कार्यकर्ते जमा होण्यास सुरुवात होईल.

सुरुवात : सकाळी ११ ते ११:३० वाजेच्या सुमारास भायखळा येथील रिचर्डसन अँड क्रुडास कंपनीपासून मोर्चाला सुरुवात होईल.

सांगता : हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) समोरील मुंबई महापालिका (BMC) मुख्यालयाजवळ पोहोचेल.

सभा : बीएमसी मुख्यालयासमोर उभारण्यात येणाऱ्या व्यासपीठावर या मोर्चाचे रूपांतर भव्य सभेत होईल आणि तिथेच आंदोलनाची सांगता होईल.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : “माझी माणसं सर्वत्र पसरलेली, पंधरा मिनिटांत तुझा…”;...

0
नाशिक रोड | Nashik Road येथील गोसावीवाडी परिसरातील चर्चित सुमित पगारे हत्याकांडाला (Summit Pagare Murder Case) दोन महिने उलटून गेले तरीही हे प्रकरण शांत होण्याऐवजी...