मुंबई | Mumbai
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांचा एक व्हिडीओ त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्यामध्ये कोकाटे हे मोबाईलवर रमी गेम खेळताना दिसत आहेत. या व्हिडीओवरून माणिकराव कोकाटे टीकेचे धनी झाले असून, विरोधकांकडून त्यांचा चांगलाच समाचार घेतला जात आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी देखील माणिकराव कोकाटे यांच्यावर निशाणा साधला आहे.
रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांनी एक्सवर (ट्विट) पोस्ट केली असून त्यात म्हटले की, “एक्का, दुर्री, तिर्री आणि हा बघा जोकर… शेतकऱ्यांच्या (Farmer) आयुष्याचा खेळ करून मंत्री महोदय ऑनलाईन रमी खेळत आहेत. मंत्रीपद न राहण्याच्या सर्व अटी कृषीमंत्र्यांनी पूर्ण केल्या आहेत. त्यांच्या खात्यात भ्रष्टाचार होतोय. ते शेतकऱ्यांना भिकारी म्हणतात. अर्वाच्य भाषेत बोलतात. पण शेतकऱ्यांबाबत एकही काम करत नाही”, असे म्हणत त्यांनी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.
मंत्री माणिकराव कोकाटेंनी दिले स्पष्टीकरण
माझ्या फोनमध्ये अधिवेशनाच्या वेळी खालच्या सभागृहात काय चालू आहे, हे बघण्यासाठी मी युट्युब उघडले. त्याच्यावर जंगली रमी गेमची जाहिरात आली. ती जाहिरात मी स्किप करत होतो. जाहिरात स्किप करण्यासाठी मला दोन ते तीन सेकंद लागले. मात्र, रोहित पवारांनी त्या व्हिडीओत १८ सेकंद दाखवले आहेत. त्यांनी अजून पुढे दाखवले असते तर मी तो व्हिडीओ स्किप करत होतो हे दिसले असते. पंरतु, त्यांनी ते दाखवले नाही. मला तो व्हिडीओ काढून मुद्दाम टार्गेट केले जात आहे. विधानसभेत चोवीत तास सीसीटीव्ही कॅमरे चालू असतात, त्यामुळे मी कशाला रमी गेम खेळेल, असे माणिकराव कोकाटे यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले.
नेमकं प्रकरण काय?
नुकतेच राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन पार पडले. या अधिवेशनात राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे थेट सभागृहात जंगली रमी खेळत होते, असा व्हिडीओ राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यामुळे कोकाटे यांच्यावर विरोधकांकडून टीका केली जात असल्याचे बघायला मिळत आहे. त्यावर कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी खुलासा केला आहे.




