मुंबई | Mumbai
प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक आणि अभिनेते महेश मांजरेकर यांच्या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ‘मराठी माणसांसाठी आमच्यातील वाद किरकोळ असून, मी महाराष्ट्राच्या हितासाठी माझा इगो बाजूला ठेवून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत युती करण्यास तयार आहे, असे म्हटले होते. त्यानंतर राज ठाकरेंच्या या आवाहनाला प्रतिसाद देतांना उद्धव ठाकरेंनी ‘मी देखील किरकोळ भांडणं बाजूला ठेवून युतीस तयार आहे’, असे म्हटले होते.
त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा रंगू लागली आहे. मात्र, या युतीवरून मनसे नेत्यांमध्ये काहीसे नाराजीचे वारे वाहू लागल्याचे दिसून येत आहे. आज (रविवारी) मनसेचे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी मध्यमांशी संवाद साधत विविध मुद्द्यावर भाष्य केले आहे. तसेच संपूर्ण मराठी माणसांनी एकत्र यायला हवे. फक्त ठाकरे बंधूच का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
यावेळी बोलतांना संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) म्हणाले की, “युतीचा विषय केवळ निवडणुकीपुरता नाही. आता कोणती निवडणूक आहे? जेव्हा निवडणुका येतील तेव्हा निवडणुकीचा विचार करु. आता विषय हिंदी सक्तीचा विषय आहे. परप्रातींयांचा विषय आहे. बँकांमध्ये मराठीचा वापर होत नाही, तो विषय आहे. त्यावर महाराष्ट्रातील (Maharashtra) सर्व पक्षांनी एकत्र आले पाहिजे. उद्धव ठाकरे यांनी हिंदीच्या आंदोलनास पाठिंबा दिला पाहिजे”, असे त्यांनी म्हटले.
पुढे ते म्हणाले की, “भाजपने (BJP) कोण हिंदुत्ववादी कोण नाही, हे प्रमाणपत्र देऊ नये. तसेच शिवसेना उबाठानेही हा महाराष्ट्रद्रोही आहे, असे प्रमाणपत्र कोणाला देऊ नये. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मनसे सैनिकांवर १७ हजार गुन्हे दाखल झाले होते. ती चूक उद्धव ठाकरे यांना वाटते का? ते त्याबद्दल मनसेची माफी मागणार का?”, असा प्रश्नही संदीप देशपांडे यांनी विचारला.
पुढे ते म्हणाले की, “कावेरीसाठी तामिळनाडूतील (Tamilnadu) पक्षातील एकत्र येतात, मग आपण का नाही? महाराष्ट्रात सर्वांनी एकत्र यावे, अशी भूमिका राज ठाकरे यांनी त्या मुलाखतीत मांडली. राज ठाकरे यांची संपूर्ण मुलाखत उबाठा आणि मनसे युती एवढी संकुचित नाही. त्यात अनेक विचार आहेत. मराठी माणसांचे अनेक प्रश्न आहेत. महाराष्ट्राच्या हिताचे अनेक प्रश्न आहेत. निवडणूक (Election) आल्यावर तू ही लढ, मी ही लढतो, एवढा संकुचित विचार राज साहेबांनी मांडला नाही”, असेही संदीप देशपांडे यांनी म्हटले.
तेव्हा उद्धव ठाकरे पहिल्या मजल्यावरुन तळ मजल्यावर आले नाहीत
२०१७ साली देखील शिवसेना आणि मनसेच्या (Shivsena-MNS) युतीची चर्चा सुरु होती. यासाठी मी देखील या घडामोडीमध्ये होतो. मी त्याचा साक्षीदार सुद्दा आहे. त्यांना वाटले होते आम्ही २०१७ साली भाजप सोबत जात आहोत. २०१७ ला बाळा नांदगावकर मातोश्रीवर गेले होते. मात्र, तेव्हा उद्धव ठाकरे वरील मजल्यावरुन तळ मजल्यावर आले नाहीत, असेही संदीप देशपांडे म्हणाले.