मुंबई | Mumbai
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (Local Body Election) पार्श्वभूमीवर मुंबईतील वाय बी चव्हाण सेंटरमध्ये आज (मंगळवारी) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची (NCP Sharad Pawar) बैठक पार पडली. या बैठकीत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी पदाचा राजीनामा (Resignation) दिल्यानंतर नव्या प्रदेशाध्यक्षांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे (MLA Shashikant Shinde) यांची निवड करण्यात आली आहे. पक्षाच्या बैठकीत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. शिंदे यांच्या नावाचा प्रस्ताव अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी मांडला. त्यानंतर सर्वांनी शशिकांत शिंदे यांच्या नावाला अनुमोदन दिले. यानंतर शरद पवारांनी शशिकांत शिंदे यांच्या नावाची राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून घोषणा केली.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष (State President) पदाच्या बदलाची चर्चा सुरू होती. जयंत पाटील हे गेल्या सात वर्षांपासून पक्षाची धुरा सांभाळत होती. त्यांनी पक्षाच्या वर्धापनदिनाच्या मेळाव्यात बोलतांना आपल्याला या पदावरून मुक्त करावे आणि नव्या लोकांना संधी द्यावी अशी जाहीर मागणी केली होती. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने शशिकांत शिंदे यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड केली आहे.
शशिकांत शिंदेंची राजकीय वाटचाल
शशिकांत शिंदे हे सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील हुमगाव येथील रहिवासी आहेत. ते वाणिज्य शाखेचे पदवीधर असून माथाडी कामगारांचे प्रभावी नेते म्हणून ओळखले जातात. त्यांचा जन्म १९ ऑक्टोबर १९६३ रोजी झाला. शिंदे हे लहान वयातच समाजकारण आणि राजकारणात सक्रिय झाले. त्यांनी १९९९ साली प्रथम जावळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि १२ हजार मतांच्या फरकाने विजय मिळवला. त्यानंतर त्यांनी राज्य सरकारच्या कृष्णा खोरे पाटबंधारे महामंडळाचे जलसंपदामंत्री म्हणून काम पाहिले आहे. २००९ ते २०१४ या कालावधीत त्यांनी कोरेगाव मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार म्हणून काम केले. या निवडणुकीत त्यांनी शालिनीताई पाटील यांचा पराभव केला होता. शिंदे हे दोन पंचवार्षिक जावळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहिले आहेत.
तर दोन पंचवार्षिक कालावधीसाठी कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे देखील ते आमदार होते. मात्र, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा शिवसेनेच्या महेश शिंदे यांनी पराभव केला. तसेच २०२४ साली शशिकांत शिंदे यांनी सातारा लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीतून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) उमेदवार म्हणून महायुतीचे उमेदवार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. मात्र या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत शशिकांत शिंदे यांनी कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार महेश शिंदेंविरोधात निवडणूक लढवली. पंरतु, या निवडणुकीतही त्यांचा पराभव झाला. सध्या ते विधान परिषद आमदार आणि शरद पवार गटाचे मुख्य प्रतोद आहेत.





