मुंबई | Mumbai
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena UBT) पक्षाला मुंबईत मोठा धक्का बसला आहे. ठाकरे कुटुंबासोबत चांगले संबंध असणाऱ्या तेजस्वी घोसाळकर (Tejasvee Ghosalkar) यांनी पक्षाच्या महिला विभागप्रमुख पदाचा राजीनामा देत पक्षाला रामराम ठोकला आहे. लोकसभेला (Loksabha) तिकीट न मिळाल्याने घोसाळकर नाराज असल्याचे बोलले जात होते. त्यानंतर अखेर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी राजीनामा दिला आहे.
शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते अभिषेक घोसाळकर (Abhishekh Ghosalkar) यांची फेसबुक लाईव्ह सुरु असताना मॉरीस नरोन्हाने हत्या केली होती. यानंतर आता त्यांच्या पत्नी तेजस्वी घोसाळकर यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे. आगामी मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या (Election) पार्श्वभूमीवर ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे.
स्थानिक विभाग प्रमुख आणि विभाग संघटक यांच्याबद्दल नाराजी व्यक्त करत तेजस्वी घोसाळकर यांनी राजीनामा दिल्याचे बोलले जात आहे. तेजस्वी घोसाळकर यांनी विभाग प्रमुख आणि विभाग संघटक यांच्याबद्दल अनेक वेळा नाराजी व्यक्त करून सुद्धा पक्षाकडून दखल न घेतल्यामुळे त्यांनी राजीनामा (Resign) दिल्याची चर्चा आहे. तसेच राजीनामा दिल्यानंतर तेजस्वी घोसाळकर यांना मातोश्रीवरून बोलवण्यात आले असून, त्यांची समजूत घालण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, राजीनामा दिल्यानंतर माजी नगरसेविका तेजस्विनी घोसाळकर भाजपमध्ये किंवा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच गेल्या महिन्यामध्ये (Month) तेजस्वी घोसाळकर यांना व्हॉट्सअप ग्रुपवर जीवे मारण्याची धमकी आली होती. तेजस्वी घोसाळकर यांच्या नावाने व्हॉट्सअप ग्रुपवर मेसेज शेअर करण्यात आला होता. ‘लालचंद इनको देखकर सुधर जा, इसकी बिवी को मत मरवा देना लालचंद’, अशा आशयाचा त्यामध्ये मजकूर होता.
तेजस्वी घोसाळकरांनी राजीनाम्यात काय म्हटलंय?
मी, तेजस्वी घोसाळकर महिला दहिसर विधानसभा प्रमुख, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), या पदावरून वैयक्तिक कारणास्तव राजीनामा देत आहे. या पदावर कार्य करताना मला पक्षाच्या कार्यपद्धतीशी एकनिष्ठ राहून कार्य करण्याची संधी मिळाली, त्याबद्दल मी पक्षप्रमुख व आपले मन:पूर्वक आभार मानते. माझा हा राजीनामा स्वीकारावा, ही नम्र विनंती.