Saturday, June 6, 2026
HomeराजकीयMaharashtra Politics : राजकीय वर्तुळात खळबळ! ठाकरेंचा माजी खासदार अजितदादा गटाच्या संपर्कात?...

Maharashtra Politics : राजकीय वर्तुळात खळबळ! ठाकरेंचा माजी खासदार अजितदादा गटाच्या संपर्कात? राज्यसभेसाठी लॉबिंग

मुंबई । Mumbai

राजकारण आणि अनपेक्षित घडामोडी हे समीकरण महाराष्ट्राला नवीन नाही. केव्हा, कुठे आणि कशी राजकीय समीकरणे बदलतील, याचा नेमका अंदाज बांधणे भल्याभल्या राजकीय विश्लेषकांनाही शक्य होत नाही. सध्या राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा कमालीचे तापले असून, निमित्त ठरले आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या राज्यसभेच्या एका जागेचे. या जागेवर आपली वर्णी लागावी म्हणून सध्या इच्छुकांनी अक्षरशः रीघ लावली आहे. मात्र, उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक असताना, या संपूर्ण प्रक्रियेत असे काही नाट्यमय वळण आले आहे, ज्याने थेट उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची धडकी भरवली आहे.

- Advertisement -

राज्यसभेची उमेदवारी मिळवण्यासाठी सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत स्पर्धा शिगेला पोहोचली आहे. पक्षातर्फे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ हे या जागेसाठी मुख्य इच्छुक असल्याचे बोलले जात आहे. भुजबळांच्या नावासोबतच प्रमोद हिंदुराव, अविनाश आदिक आणि समीर भुजबळ यांसारख्या मातब्बर नेत्यांची नावे देखील शर्यतीत आघाडीवर आहेत. या सर्वांमध्ये नेमकी कुणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडणार, यावर पक्षात जोरदार खलबतं सुरू आहेत. मात्र, केवळ पक्षांतर्गत नेत्यांवरच गाडी थांबलेली नाही; तर पक्षाबाहेरील एखाद्या बड्या चेहऱ्याला संधी देऊन राजकीय धक्का देण्याची तयारीही सुरू असल्याची खात्रीलायक माहिती मिळत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून माजी खासदार नवनीत राणा यांच्याशी संपर्क साधण्यात आला होता आणि त्यांना ही उमेदवारी स्वीकारण्याची विनंती करण्यात आली होती. परंतु, नवनीत राणा यांनी आपली राजकीय विचारधारा आणि काही तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन या प्रस्तावाला नम्रपणे नकार दिल्याचं समजतं. त्यातच परवाच राणा दाम्पत्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची घेतलेली भेट ही केवळ सदिच्छा भेट होती की त्यामागे काही वेगळे राजकीय गणित होते, यावरही आता तर्कवितर्क लावले जात आहेत.

नवनीत राणा यांचे नाव मागे पडत असतानाच या संपूर्ण घडामोडीत आता एक मोठा आणि धक्कादायक ‘ट्विस्ट’ समोर आला आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना (UBT) पक्षातील एक माजी खासदार थेट राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर राज्यसभेवर जाण्यासाठी कमालीचे उत्सुक असल्याचे समोर आले आहे. या माजी खासदाराने राष्ट्रवादीकडे उमेदवारीसाठी जोरदार फिल्डिंग लावली असून, पडद्यामागे तगडे लॉबिंग सुरू केले आहे. मात्र, अद्याप तरी राष्ट्रवादी काँग्रेसकडून या माजी खासदाराला अपेक्षित असलेला सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसल्याची माहिती आहे. त्यामुळे आता ठाकरेंचा हा माजी खासदार नेमका कोण? या नव्या कोड्याने संपूर्ण राजकीय वर्तुळात प्रचंड उत्सुकता निर्माण केली आहे.

आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी हातात केवळ ४८ तास उरले असल्याने, अंतिम निर्णय घेण्यासाठी उद्या मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची एक अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. याच बैठकीत सर्व नावांवर अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आता या ‘सस्पेन्स’वरून पडदा कधी उठणार आणि राज्यसभेचे तिकीट नेमकं कुणाला मिळणार, याकडे लागले आहे.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : जबरी चाेरीच्या पैशातून ‘लॉंगड्राईव्ह’; टेलरच्या जबरी लुटीचा...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik एक जबरी चोरी आणि चोर-पोलिसांच्या (Police) लपाछपीचा थरार नाशिकमधून उघडकीस आला आहे. सातपूर भागात एका मोठ्या 'गोल्डमॅन'ला लुटून मालामाल होण्याचे...