मुंबई | Mumbai
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर विशाखा राऊत (Vishakha Raut) यांचे नगरसेवकपद रद्द करण्यात आले आहे. पालघर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने त्यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवल्यानंतर राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने यासंबंधीची अधिसूचना जारी केली. मुंबई महानगरपालिकेच्या (Mumbai Municipal Corporation) आगामी महासभेत त्यांच्या अपात्रतेची औपचारिक घोषणा केली जाणार आहे.
२०२६ च्या मुंबई महापालिका निवडणुकीत विशाखा राऊत यांनी दादर (Dadar) येथील प्रभाग क्रमांक १९१ (नागरिकांचा मागासवर्ग – महिला राखीव) मधून विजय मिळवला होता.मात्र, आता पडताळणी समितीने त्यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवल्याने मुंबई महापालिका अधिनियमातील कलम १६ नुसार त्या अपात्र ठरल्या. या निर्णयाविरोधात राऊत यांनी उच्च न्यायालयात (High Court) दाद मागितली होती, मात्र न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावत दिलासा देण्यास नकार दिला.
६ वर्षांची अपात्रता आणि महापालिकेतील स्थिती
नगरविकास विभागाच्या अधिसूचनेनुसार, विशाखा राऊत यांना २० ऑगस्ट २०२६ पासून पुढील ६ वर्षांच्या कालावधीसाठी नगरसेवक (Corporator) म्हणून निवडून येण्यास किंवा पदावर राहण्यास अपात्र घोषित करण्यात आले आहे. जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे नगरसेवकपद गमावणाऱ्या लोकप्रतिनिधींची संख्या आता पाचवर पोहोचली आहे.
राजकीय वर्तुळात चर्चा
पूर्वीच्या चार नगरसेवकांच्या प्रकरणात नगरविकास विभागाने थेट अशी स्वतंत्र अधिसूचना जारी केली नव्हती. मात्र, विशाखा राऊत यांच्याबाबत सरकारने विशेष राजपत्र अधिसूचना काढल्यामुळे प्रशासकीय व राजकीय गोटात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. दादरसारख्या महत्त्वाच्या बालेकिल्ल्यात अनुभवी नेत्याचे पद रद्द होणे हा ठाकरे गटासाठी मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.




