मुंबई | Mumbai
दोन दिवसांपूर्वी महायुती सरकारने (Mahayuti Government) राज्यातील पालकमंत्र्यांची (Guardian Minister) यादी जाहीर केली होती. मात्र त्याच्या दुसऱ्या दिवशीच म्हणजे (दि. १९) रोजी सामान्य प्रशासन विभागाने जीआर काढत रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाच्या निर्णयाला स्थगिती दिल्याचे सांगितले. त्यामुळे महायुतीमधील पालकमंत्रीपदाचा वाद चव्हाट्यावर आल्याचे दिसून आले. पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याचे बोलले जात आहे.
कारण रायगडच्या पालकमंत्रीपदी शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले तर नाशिकच्या पालकमंत्रीपदी दादा भुसे यांची नेमणूक व्हावी यासाठी शिंदे आग्रही होते. पंरतु, रायगडच्या पालकमंत्रीपदी आदिती तटकरे आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन यांची नियुक्ती करण्यात आली. यामुळे शिंदे अचानक दरे गावाकडे रवाना झाले होते.यानंतर आता त्यांची मनधरणी करण्यासाठी भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) आणि गिरीश महाजन (Girish Mahajan) दरे गावाला निघाल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) वैयक्तिक कारणासाठी चार दिवस दरे गावी रवाना झाल्याचे बोलले जात आहे. मात्र पालकमंत्रिपद वाटपावरून एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा आहे. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि गिरीश महाजन पालकमंत्रीपदावरून चर्चा करणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे तिघांमध्ये नेमकी काय चर्चा होते?, भेटीत कोणता तोडगा निघतो? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.