मुंबई | Mumbai
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Elections) महायुतीला बहुमत मिळाले. त्यानंतर (दि.०५ डिसेंबर) रोजी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुती सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार रविवार (दि.१५ डिसेंबर) रोजी पार पडला. यावेळी महायुतीच्या (Mahayuti) ३९ मंत्र्यांनी शपथ घेतली. यात ३३ कॅबिनेट मंत्री तर ६ राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर एक ते दोन दिवसांत खातेवाटप होईल, अशी शक्यता होती. पंरतु, मंत्रिमंडळ विस्ताराला (Cabinet Expansion) आठवडा होत आला तरी अद्याप खातेवाटप झालेले नाही. अशातच आता पुढील काही तासांत मंत्रिमंडळाचे खातेवाटप होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हिवाळी अधिवेशनाचा (Winter Session) आजचा शेवटचा दिवस असल्याने आजच महायुती सरकारचे खातेवाटप होणार असल्याचे बोलले जात आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी त्यांच्या रामगिरी बंगल्यावर चहापानाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमाला शिंदे आणि पवारांच्या आमदारांना बोलावण्यात आले आहे. त्यामुळे आज खातेवाटपाचा तिढा सुटणार असल्याचे बोलले जात आहे. तसेच गृह खात्यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये मोठा वाद झाला होता. मात्र, अखेर भाजप स्वत:कडे गृहखाते ठेवण्यास यशस्वी झाली आहे. तसेच शिवसेनेकडे नगरविकास खाते दिले जाणार असल्याचे समजते.
दरम्यान, दुसरीकडे महायुती सरकारमध्ये खातेवाटपाचा फॉर्म्युला ठरला असून त्यानुसार भाजपकडे (BJP) महसूल, सार्वजनिक बांधकाम, पर्यटन आणि ऊर्जा ही चार खाती असणार आहेत. तर शिवसेनेकडे नगरविकास आणि गृहनिर्माण खातं राहण्याची शक्यता आहे. त्यापाठोपाठ राष्ट्रवादीकडे (NCP) अर्थ खातं आणि उत्पादन शुल्क खातं राहणार असल्याचे बोलले जात आहे. तर गेल्या काही दिवसांपासून महायुतीत तिढा निर्माण झालेले गृहखातं अखेर भाजपला मिळणार असल्याचे निश्चित झाले आहे.