मुंबई | Mumbai
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून खासदार प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे (MP Praful Patel and Sunil Tatkare) यांचे पदे वगळल्याची चर्चा सुरु आहे. त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात चालू झाली आहे. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाबाबत मोठा दावा केला आहे.
आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे (Ajit Pawar NCP) खासदार सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे २२ आमदार घेऊन २०२९ साली भारतीय जनता पक्षातून विधानसभेची निवडणूक लढणार असल्याचा सनसनाटी दावा केला आहे. तसेच एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) पक्षाचे देखील काही आमदार भाजपच्या गळाला लागले आहे, असा दावाही त्यांनी केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. तर सुनील तटकरे यांनी शरद पवारांची घेतलेल्या भेटीबाबत बोलतांना रोहित पवारांनी ‘त्यांना कदाचित सिल्व्हर ओकचा चहा आवडत असेल’, असे म्हणत टोला लगावला.
रोहित पवार नेमकं काय म्हणाले?
सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासह २२ आमदारांचे ऑलरेडी ठरलेलं आहे. एकनाथ शिंदे यांच्याही काही आमदारांचे ठरले आहे. ज्या गोष्टी ठरल्या आहेत, त्याबद्दल मोघम बोलून चालत नाही. जे आहे ते आहे. भाजपमधून (BJP) ते लढणार आहेत. फक्त प्रक्रिया फास्ट झाली. २०२९ च्या निवडणुकांपूर्वी होणं अपेक्षित होतं. कारण आताच प्रवेश झाला, तर पुन्हा निवडणूक लागेल. भाजपसोबत जे आहेत, त्यांच्याबरोबर आम्ही जाणार नाही, पण भाजपची साथ सोडून कोणी आमच्याकडे आलं, तर त्यांना स्वीकारु, असं रोहित पवार यांनी म्हटले.




