मुंबई | Mumbai
भारतीय संघाचा माजी मराठमोळा खेळाडू केदार जाधव (Kedar Jadhav) क्रिकेटनंतर त्याच्या राजकारणातील नव्या इनिंगला सुरूवात करत आहे. केदार जाधव आज दुपारी तीन वाजता मुंबईतील (Mumbai) भाजपच्या पक्ष कार्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री चंद्रेशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) हे देखील उपस्थित राहणार आहेत.
केदार जाधवने २०२४ मध्ये वयाच्या ३९ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून (International Cricket) निवृत्ती घेतली होती. त्याने भारतीय संघाकडून खेळताना वनडे आणि टी-२० फॉरमॅटमध्ये प्रतिनिधित्त्व केले होते. केदारने भारतीय संघाकडून २०१४ साली वन डे क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने ७३ वन डे सामने खेळले असून त्यामध्ये ५२ डावात १३८० धावा केल्या आहेत. यामध्ये दोन शतके आणि सहा अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच २७ विकेट देखील घेतल्या आहे.
तर टी-२० फॉरमॅटमध्ये त्याने २०१५ साली पदार्पण केले होते. यात टी-२० क्रिकेटमधील (T 20 cricket) ९ सामने खेळतांना त्याने १२२ धावा केल्या असून ५८ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. तसेच आयपीएलमध्ये ९५ सामने खेळताना ८१ डावात त्याने १२०८ धावा केल्या आहेत. यात ४ अर्धशतकांचा देखील समावेश आहे. त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कसोटी खेळण्याची संधी मिळालेली नाही.
दरम्यान, केदारने काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) आणि भाजप नेते आशिष शेलार यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर केदारच्या राजकारणामध्ये प्रवेशाच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र, आता तो भाजपमध्ये (BJP) प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले आहे.