मुंबई | Mumbai
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder Case) यांच्या हत्येचे फोटो व्हायरल झाल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. त्यानंतर आज (दि.४) रोजी धनंजय मुंडे यांनी आपल्याकडे असणाऱ्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यावरून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
यावेळी बोलतांना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले की,”धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत शिवसेना ठाकरे गटाच्यावतीने सर्व आमदारांनी भूमिका मांडली. आता सर्वांना प्रश्न असा आहे की, संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेचे फोटो सरकारकडे आधी आले नव्हते का? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पारदर्शीपणे काम करत असतील तर त्यांचं स्वागत आहे. पण पारदर्शीपणे काम करत असताना त्यांचे हात कोणी बांधतंय का? हा प्रश्न आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेचे फोटो आधीच मुख्यमंत्र्यांकडे आले होते का? जर आले असतील तर मग धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची कारवाई आधीच का नाही झाली?”, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
पुढे त्यांना धनंजय मुंडे यांचा राजीनामा (Resignation) हा नैतिकतेच्या मुद्द्यावर की आजारापणामुळे घेण्यात आला असा प्रश्न विचारण्यात आला असता त्यावर उत्तर देतांना उद्धव ठाकरे म्हणाले की,”धनंजय मुंडे यांनी तब्येतीचे कारण देत राजीनामा दिला आहे. तर अजित पवार म्हणतात की नैतिकतेच्या मुद्द्यावरून त्यांनी राजीनामा दिला. नैतिकतेचा मुद्दा असेल तर एवढे दिवस त्यांचा राजीनामा का घेतला नाही? मुंडेंनी तब्येतीचे कारण सांगितले असेल आणि आता जर एवढे व्हिडीओ आणि फोटो समोर आले असतील तरीही त्या गोष्टीवरून त्यांचा राजीनामा का घेतला नाही हे स्पष्ट करावे”, असेही त्यांनी म्हटले.
तसेच “अगोदर फक्त यूपी आणि बिहारचे (Bihar) नाव बदनाम व्हायचे.आता त्या दोन राज्यांसह महाराष्ट्रातही भाजपचे राज्य आहे. त्या दोन राज्यात काय सुरू आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. महाराष्ट्रात तर त्यापेक्षाही वाईट परिस्थिती आहे. या सगळ्याचा नागरिकांना आता कंटाळा आला आहे. आता फक्त राजीनामा नाही तर अजून ज्या गोष्टी समोर येत आहेत, त्यावरही सरकारने लक्ष दिले पाहिजे. सध्याच्या परिस्थितीत सरकारपेक्षा महाराष्ट्र बदनाम होत आहे”, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदावर ठाकरे गटाचा दावा
विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदावर भास्कर जाधव यांची नियुक्ती करावी अशी मागणी करणारे पत्र आज शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने अध्यक्ष राहुल नार्वेकरांना देण्यात आले आहे. यावर बोलतांना उद्धव ठाकरे म्हणाले की “आम्ही विधानसभा अध्यक्षांकडे विरोधी पक्षनेते पदासाठी भास्कर जाधव यांच्या नावाची मागणी केलेली आहे. आम्हाला खात्री आहे ही लोकशाही मूल्यांचा पालन करून लवकरात लवकर यावर निर्णय होईल. बजेटपूर्वी विरोधी पक्ष नेतेपद दिले जाईल”, असे त्यांनी म्हटले.