मुंबई | Mumbai
गणेशोत्सवात ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackaray) यांनी सहकुटुंब मनसेप्रमुख राज ठाकरेंच्या (Raj Thackaray) घरी भेटी दिली होती. यावेळी त्यांनी राज यांच्या घरी विराजमान असलेल्या गणपती बाप्पाचे दर्शन घेतले होते. त्यानंतर आज (बुधवारी) पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी भेट घेतली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
उद्धव ठाकरे यांच्यासोबत खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि आमदार अनिल परब (Anil Parab) हे देखील राज ठाकरे यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. तर मनसेकडून राज ठाकरे यांच्यासोबत मनसे नेते बाळा नांदगावकर हे देखील उपस्थित आहेत. गेल्या २५ ते ३० मिनिटांपासून या नेत्यांमध्ये बैठक सुरु असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर चर्चा सुरु असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, ठाकरे बंधूंच्या या वाढत्या भेटीगाठींमुळे मनसे आणि ठाकरेची शिवसेना एकत्र येण्याचे द्योतक मानले जात आहे. दोन दिवसांपूर्वीच राज्यातील काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. यावेळी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (मनसे) महाविकास आघाडीत (Mahavikas Aaghadi) घेण्याविषयी चर्चा झाली होती. त्यावर काँग्रेस पक्षाने सावध भूमिका घेतली होती. याविषयी आम्ही दिल्लीतील हायकमांडला विचारु, असे त्यांनी उद्धव ठाकरे यांना सांगितले होते.त्यांनतर आता या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची आजची भेट महत्त्वाची मानली जात आहे.





