मुंबई | Mumbai
मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक, अभिनेते महेश मांजरेकर (Actor Mahesh Manjrekar) यांच्या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत ‘मराठी माणसांसाठी आमच्यातील वाद किरकोळ असून मी महाराष्ट्राच्या हितासाठी माझा इगो बाजूला ठेवून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत युती करण्यास तयार आहे, असे म्हटले होते. त्यानंतर आता राज ठाकरेंच्या या टाळीवर उद्धव ठाकरेंनीही हाळी दिली आहे. मात्र, त्यासाठी उद्धव ठाकरेंनी काही अटी शर्ती ठेवल्या आहेत. आज श्री छत्रपती महाराज शिवाजी मंदिर स्मारक मंडळ, दादर येथे आयोजित केलेल्या भारतीय कामगार सेनेच्या ५७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते.
यावेळी बोलतांना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले की, “किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मीही तयार आहे. सर्व मराठी माणसांच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येण्याचे आवाहन करत आहे. पण माझी अट एक आहे, जेव्हा आम्ही लोकसभेच्या वेळेला सांगत होतो, महाराष्ट्रातून गुजरातमध्ये कारभार घेऊन जात आहेत, तेव्हाच जर विरोध केला असता तर हे सरकार तिकडे बसले नसते. महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारे सरकार केंद्रात बसवले असते. त्याचवेळेला हे काळे कामगार कायदे फेकून दिले असते. पण तेव्हा पाठिबा द्यायचा, आता विरोध करायचा. मग तडजोड करायची, हे असं चालणार नाही”, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली.
पुढे बोलतांना ते म्हणाले की,”महाराष्ट्राच्या (Maharashtra) हिताच्या जो आड येईल त्याचं स्वागत मी करणार नाही, त्याला घरी बोलवणार नाही, त्याच्या घरी मी जाणार नाही, त्याच्या पंगतील बसणार हे आधी ठरवा. मग महाराष्ट्र हिताच्या गोष्टी करा. माझ्याकडून कुणाशी भांडणे नव्हतीत, पण मी मिटवून टाकली चला. त्यावेळी सर्व मराठी माणसांनी ठरवायचे भाजपसोबत जायचे की शिवसेनेसोबत म्हणजे एसंशी, गद्दार नव्हे तर माझ्यासोबत जायचं”, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटले.
तसेच “कुणासोबत जाऊन मराठी माणसाचे आणि हिंदुत्वाचे हित होणार आहे हे ठरवा. मग विरोध करायचा की बिनशर्त पाठिंबा द्यायचा ठरवा. महाराष्ट्राचे हित ही एकच शर्त माझी आहे. पण मग बाकीच्या चोरांना कळत नकळत पाठिंबा देणार नाही. त्यांचा छुपा प्रचार करणार नाही, अशी छत्रपती शिवाजी महाराजांसमोर (Chhatrapati Shivaji Maharaj) शपथ घ्यायची. मग टाळी द्यायची भाषा करा”, असे देखील उद्धव ठाकरे म्हणाले.