नाशिक | प्रतिनिधी | Nashik
बंगालच्या उपसागरात (Bay of Bengal) बुधवारी (दि. २४) कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार असून रविवार (दि.२८) पर्यंत तो राज्यात येण्याची शक्यता आहे. या कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे नाशिक, खान्देशसह राज्यातील विविध भागांमध्ये २६ ते २८ सप्टेंबरदरम्यान ढगाळ हवामान आणि पावसात (Rain) वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने (Meteorological Department) वर्तवली आहे.
या आठवड्यात मान्सून (Monsoon) परत सक्रिय होणार आहे. त्यामुळे ३० सप्टेंबरपर्यंत तरी राज्यातून मान्सून निरोप घेण्याची शक्यता नाही. सध्याच्या हवामानाच्या अंदाजानुसार २२ ते २५ सप्टेंबरम्यान राज्यातील विविध भागांमध्ये मेघगर्जनेसह वादळी पाऊस अपेक्षित आहे. जो प्रामुख्याने दुपारनंतर पडेल. कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव २६ तारखेपासून जाणवण्याची शक्यता आहे. या दिवशी विदर्भ आणि मराठवाड्यातील पूर्व आणि दक्षिणेकडे असलेल्या भागांमध्ये दुपारनंतर पावसात बाढ होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, २७ तारखेला विदर्भ, मराठवाडा, खान्देश, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये पावसात वाढ होऊ शकते, यातील काही भागांमध्ये मुसळधार स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. रविवारी (दि. २८) राज्यातील पश्चिम भागामध्ये पावसाचा जोर कायम राहू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी (Farmer) हवामानाच्या (IMD) या अंदाजानुसार शेतीचे नियोजन करावे. काढणी केलेल्या पिकांना पाऊस आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावे, असे आवाहन कृषी विभागाकडून (Department of Agriculture) करण्यात आले आहे.
नाशकात ३६ मिमी पाऊस
नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच माळेला शहरात पावसाने (Rain) दमदार हजेरी लावल्याने व्यावसाविकांचा चांगलाच हिरमोड झाला. सोमवारी सकाळी साडेआठ ते रात्री साडेठ वाजेपर्यंत १२ तासांत ३७ मि.मी. पावसाची नोंद झाली. या पावसामुळे कालिका माता यात्रेच्या उत्साहावर काहीअंशी परिणाम झाला. व्यावसायिकांना त्याची झळ सोसावी लागली. पावसामुळे वाहतुकीवर परिणाम झाला. दिवसभर पावसाची अधूनमधून रिपरिप सुरू होती. रात्री साडेसात वाजेनंतर पावसाचा जोर चांगलाच वाढला होता. त्यामुळे रस्ते जलमय झाले होते. पावसामुळे दांडीया खेळणाऱ्यांचाही हिरमोड झाला. लाखो रुपये खर्च करून मंडळांनी दांडीयाचे कार्यक्रम आयोजित केले आहेत. त्यांच्या उत्साहावरही विरजण पडले आहे.




