मुंबई | Mumbai
गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह (Mumbai) राज्यातील विविध जिल्ह्यांतील तापमानाचा उच्चांक वाढतांना दिसत आहे. पहाटे काही प्रमाणात गारवा जाणवत असून दिवसा उन्हाचा चटका बसत आहे. त्यामुळे अंगाची लाहीलाही होतांना दिसत आहे. अशातच आता भारतीय हवामानशास्त्र विभागाने (Indian Meteorological Department) गुढीपाडव्यापासून हलक्या रिमझिम आणि गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.
यात ३१ मार्च रोजी ठाणे, पालघर, नाशिक, अहिल्यानगर, धुळे, नंदुरबार, सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर ०१ एप्रिल रोजी ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, नाशिक, अहिल्यानगर, जळगाव, छत्रपती संभाजी नगर, बीड, जालना, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती या जिल्ह्यांना येलो अलर्ट (Yellow Alert) देण्यात आला आहे.
तसेच ०२ एप्रिल रोजी संपूर्ण महाराष्ट्रात (Maharashtra) पावसाची शक्यता असून यात मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर पालघर, सोलापूर, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, नंदुरबार, धुळे या जिल्ह्यांना पावसाचा (Rain) इशारा दिला आहे.