नवी दिल्ली | New Delhi
भारताचे ५२ वे सरन्यायाधीश (Chief Justice of India) म्हणून महाराष्ट्राचे सुपुत्र भूषण रामकृष्ण गवई (Bhushan Ramkrushna Gavai) यांनी आज बुधवार (दि.१४ मे) रोजी शपथ घेतली. हा सोहळा राष्ट्रपती भवनात पार पडला. देशाच्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी उपराष्ट्रपती जगदीप धनकड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह आदी उपस्थित होते.
देशाचे विद्यमान सरन्यायाधीश संजीव खन्ना (Sanjeev Khanna) यांनी त्यांचे उत्तराधिकारी म्हणून न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या नावाची अधिकृतपणे शिफारस केली होती. त्यानंतर केंद्रीय कायदा मंत्रालयाने त्यांच्या नावाला मंजुरी दिली होती. यानंतर गवई यांनी आज सरन्यायाधीश पदाची शपथ घेतली. भूषण गवई यांना २४ मे २०१९ रोजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून बढती देण्यात आली. यानंतर त्यांच्या निवृत्तीची तारीख २३ नोव्हेंबर २०२५ आहे.
दरम्यान भूषण गवई यांचा सरन्यायाधीशपदाचा कालावधी सहा महिन्यांचा असणार आहे. २००७ मध्ये सरन्यायाधीश म्हणून शपथ घेणारे न्या. के. जी. बालाकृष्णन यांच्यानंतर न्या. गवई हे दुसरे दलित व्यक्त ठरले आहेत. न्या. गवई यांचा प्रवास अमरावतीतून सुरू झाला असून, पुढे ते नागपूरमार्गे (Nagpur) दिल्लीपर्यंत (Delhi) पोहोचले.
कोण आहेत भूषण गवई?
न्यायमूर्ती गवई (BR Gavai CJI) यांचा जन्म २४ नोव्हेंबर १९६० रोजी महाराष्ट्रातील (Maharashtra) अमरावती येथे झाला. त्यांनी १९८५ मध्ये त्यांच्या वकिली कारकिर्दीला सुरुवात केली. १९८७ मध्ये त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात स्वतंत्र वकिली सुरू केली. यापूर्वी त्यांनी माजी अॅडव्होकेट जनरल आणि उच्च न्यायालयाचे न्यायाधीश दिवंगत राजा एस. भोसले यांच्यासोबत काम केले. १९८७ ते १९९० पर्यंत मुंबई उच्च न्यायालयात प्रॅक्टिस केली. ऑगस्ट १९९२ ते जुलै १९९३ पर्यंत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सहाय्यक सरकारी वकील आणि अतिरिक्त सरकारी वकील म्हणून नियुक्ती. १४ नोव्हेंबर २००३ रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायमूर्ती म्हणून पदोन्नती मिळाली. १२ नोव्हेंबर २००५ रोजी ते मुंबई उच्च न्यायालयाचे कायमस्वरूपी न्यायमूर्ती झाले.