Thursday, May 23, 2024
Homeजळगावग.स.संस्थेच्या सभासदांना दिलासा तर जिल्हा बँकेला मोठा धक्का!

ग.स.संस्थेच्या सभासदांना दिलासा तर जिल्हा बँकेला मोठा धक्का!

जळगाव । प्रतिनिधी jalgaon

जिल्हा बँकेने (District Bank) लिंकींग शेअर्सचे 1 कोटी 80 लाख रुपये ग.स.संस्थेला व्याजासह परत करावे, असा आदेश महाराष्ट्र राज्य सहकारी अपिलीय न्यायालय, मुंबई बेंच, औरंगाबाद यांनी दिला आहे. या निर्णयामुळे ग.स. संस्थेच्या सभासदांना दिलासा मिळाला आहे. तर जेडीसीसी बँकेला मोठा धक्का बसला आहे.

- Advertisement -

ग.स.संस्थेचे जेडीसीसी बँकेकडे सन 1916 ते 1999 या कालावधीत वेळोवेळी घेतलेल्या कर्जापोटी 1 कोटी 80 लाख रुपये शेअर्स जमा होते. सदर रक्कमेवर जेडीसीसी बँक कोणत्याही प्रकारचा लाभांश देत नसल्याने सदरील रक्कम व्याजासह परत मिळण्याबाबत ग.स.संस्थेतर्फे तत्कालीन अध्यक्ष उदय मधुकर पाटील यांचे कालावधीत सन 2006 मध्ये सहकार न्यायालय, जळगांव येथे दावा क्र.जे /540/2006 दाखल केलेला होता.

उभयपक्षाचे पुराव्याअंती सहकार न्यायालयाने दि.25 जुलै 2022 रोजी ग. स. संस्थेच्या बाजुने निर्णय पारित करून महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे नियम 23 नुसार शेअर्सचे मूल्यांकन करून रक्कम 1 कोटी 80 लाख रुपये निकालाच्या तारखेपासून 60 दिवसांचे आत ग.स.संस्थेस अदा करावी, असे न केल्यास दावा दाखल तारखेपासुन द.सा.द.शे.6 टक्के दराने व्याजाची रक्कम दयावी, असा आदेश जेडीसीसी बँकेला दिलेला होता.

या निकालाच्या विरोधात जेडीसीसी बँकेने मे महाराष्ट्र राज्य सहकारी अपिलीय न्यायालय, मुंबई बेंच, औरंगाबाद येथे अपिल नं. 54/2022 व संस्थेचे अपिल नं. 60/2022 दाखल केलेले होते. या अपिलात जळगाव येथील सहकार न्यायालयाने विवाद क्रमांक 540/2006 मध्ये दिलेला निकाल आणि निवाड्यात सुधारीत करून जेडीसीसी बँकेने ग.स. सोसायटीने सभासदत्वाचा राजिनामा दिल्याच्या दि. 1नोव्हेंबर 2003 पासून द.सा.द.शे. 8 टक्के व्याजदराने लिंकींग शेअरची रक्कम परत करण्याचे आदेश दि. 16 फेबु्रवारी 2023 रोजी न्या. व्ही.बी.कुलकर्णी यांनी दिले आहेत. शेअर्स लिंकींग रक्कम 1 कोटी 80 लाख रुपये या रक्कमेवर दि.1 नोव्हेंबर 2003 पासून द.सा.द.शे.8 टक्के दराने व्याजासहीत एकुण रक्कम रूपये 4 कोटी 57 लाख होत आहेत. महाराष्ट्र राज्य सहकारी अपिलीय न्यायालय, मुंबई बेंच, औरंगाबाद न्यायालयाचे या महत्वपुर्ण निर्णयामुळे ग.स. संस्थेच्या सभासदांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून जेडीसीसी बँकेला मोठा धक्का बसला आहे. ग.स.संस्थेतर्फे विधीतज्ञ अ‍ॅड.एम.बी.मोयखेडे यांनी काम पाहिले.

- Advertisment -

ताज्या बातम्या