मुंबई | Mumbai
करोनाच्या (Coronavirus) वाढत्या प्रादुर्भावाचा व्यापारी आणि व्यवसायिक वर्गावर मोठा परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. करोना परिस्थिती पाहता राज्यातील दुकान (Shops), मॉल (Mall) आणि उपहारागृहांना (Restaurants) ठरावीक वेळेत सुरु ठेवण्याची परवागणी देण्यात आली होती. मात्र, राज्यातील रुग्णसंख्येत घट होत असल्याने करोनाचे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत.
…तर राज्यात पुन्हा लॉकडाउन लावावा लागू शकतो; मुख्यमंत्र्यांचा इशारा
सर्व मॉल्स खुले होणार असून लसीचे दोनही डोस घेतलेल्यांना मॉल्ससह गर्दीच्या ठिकाणी प्रवेश मिळणार आहे.करोनाचे नियम पाळत येथे अधिकाधिक स्वच्छता राखली जाणार आहे. हॉटेल्सदेखील आता खवय्यांच्या स्वागतासाठी सज्ज झाले असून हॉटेलिंगची मजाही चाखता येईल. दोन डोस घेऊन १४ दिवस पूर्ण झालेल्यांसाठी मुंबईत लोकलदेखील खुली होत आहे.
तसेच आजपासून (रविवार) दुकाने, मॉल, उपाहारगृहे रात्री दहा वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. धार्मिक स्थळे, सिनेमागृहे, मल्टिप्लेक्स बंद असतील. खासगी कार्यालयांना वेळेचे व्यवस्थापन करण्यासाठी कार्यालये २४ तास सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे.
विवाह सोहळ्यांबाबतही ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. खुल्या प्रांगणात होणाऱ्या विवाह सोहळ्यांसाठी २०० जणांच्या उपस्थितीला परवानगी देण्यात आली आहे. तर मंगल कार्यालयात होणाऱ्या विवाह सोहळ्यांसाठी आसन क्षमतेच्या ५० टक्के मर्यादेने परवानगी देण्यात आली आहे.
लसीकरण पूर्ण झालेल्यांना बाहेरच्या राज्यातून महाराष्ट्र राज्यात प्रवेश करण्यासाठी आरटीपीसीआर चाचणीची आवश्यकता नसेल. अन्य प्रवाशांसाठी ७२ तास पूर्वीची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह किंवा १४ दिवस विलगीकरण आवश्यक राहील.
इनडोअर स्पोर्टस सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे. मात्र, खेळाडू आणि चालकांसह सर्वांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेले असणं अनिवार्य आहे.