मुंबई | Mumbai
परतीच्या पावसाने राज्यात धुमाकूळ घातल्याचे बघायला मिळतेय. बहुतांश जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. शेतपिकांसह नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गावांचा संपर्क तुटलाय. जनावरे दगावली आहे. तर जिवीतहानी देखील झाली आहे. दरम्यान, आजही भारतीय हवामान विभागाने पावसाचा अत्यंत मोठा इशारा दिलाय. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. यामुळे पुन्हा काही दिवस मुसळदार पावसाचा इशारा दिलाय. तसेच गरज असेल तरच घराबाहेर पडा असे देखील सांगण्यात आले आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज (28 सप्टेंबर) च्या ५.३० वाजता भारतीय प्रमाणवेळेवर आधारित राष्ट्रीय बुलेटिननुसार पश्चिम विदर्भ आणि परिसरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. तर पूर्व विदर्भ आणि परिसरात कमी दाबाचा पट्टा गेल्या ६ तासांत ४३ किमी प्रतितास वेगाने पश्चिमेकडे सरकला आणि २८ सप्टेंबर ५.३० वाजता भारतीय प्रमाणवेळेवर अकोला (विदर्भ) पासून 50 किमी दक्षिणेस, औरंगाबाद (मराठवाडा) पासून 180 किमी पूर्व-ईशान्येस, नाशिक (मध्य महाराष्ट्र) पासून 330 किमी पूर्वेस आणि सुरत (गुजरात) पासून 450 किमी पूर्व-आग्नेयेस केंद्रीत झाला. पुढील १२ तासांत तो मराठवाडा आणि लगतच्या मध्य महाराष्ट्रातून जवळजवळ पश्चिमेकडे सरकण्याची आणि हळूहळू कमकुवत होऊन एका चांगल्या कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतरित होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात पुढचे काही दिवस मुसळधार पावसाचे
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, ठाणे या भागात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. यासोबतच आज जालनामध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, पालघर या भागात रात्रभर पाऊस सुरू होता. १० वाजून गेल्यानंतरही ढगाळ वातावरणामुळे काळोखा पसरला आहे. पुढील काही तासात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. अतिमहत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळाच, असे प्रशासनाकडून सांगितले जातेय.
मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा
मराठवाड्यासमोरील अस्मानी संकट आता अधिक गडद होण्याची शक्यता आहे. कारण हवामान विभागाने पुढचे २ दिवस म्हणजेच, २८ सप्टेंबर ते २९ सप्टेंबर या दरम्यान राज्यासह मराठवाड्यातील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर उर्वरित महाराष्ट्रासाठी देखील हवामान विभागाकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे.
नाशिकमध्ये रात्रीपासून जोरदार पाऊस
नाशिक शहारासह जिल्ह्यातील अनेक भागात रात्रीपासून कुठे मुसळधार तर कुठे संततधार पाऊस सुरू आहे, त्र्यंबकेश्वर शहरात रात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे. त्र्यंबकेश्वर गावातील रस्त्यांना नदी नाल्याचे स्वरुप आले आहे, कुशावर्त तीर्थ, तसेच मुख्य बाजारपेठेत रात्रीपासून पाणी साचल्याने धार्मिक विधीसाठी त्र्यंबकेश्वरमध्ये आलेल्या भाविकांची गैरसोय झाली. नाशिकच्या गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता आहे.
दुतोंड्या मारुतीच्या गळ्यापर्यंत पाणी
नाशिक शहरात शनिवार संध्याकाळपासून जोरदार पावसाला सुरवात झाली आहे. त्यामुळे गोदावरी नदीला पुन्हा एकदा पुर आला आहे. गंगापूर धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर असल्याने धरणातून गोदावरी नदीला पाणी सोडण्यात आले आहे. गोदावरी नदीकाठी असलेल्या दुतोंड्या मारुतीच्या गळ्यापर्यंत पाणी लागले आहे. तसेच नाशिकला आज मुसळधार पावसाचा अर्लट देण्यात आल्याने गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग आणखी वाढण्याची शक्यता आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




